इंदूर शहरात ४० दिवसांच्या कालावधीत १५० हून अधिक विवाह ऐनवेळी मोडले
काही प्रकरणांमध्ये जुने प्रेमसंबंध समोर आले
काहींमध्ये वर्तनावरुन प्रश्नचिन्ह उभे राहिले.
Pre Marriage Breakup:
इंदूर : मागील काही दिवसांपूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि इंदूरचे संगीतकार पलाश मुछाल यांचा हाय-प्रोफाइल विवाह ऐनवेळी मोडला. सर्वांसाठीच हा आश्चर्याचा धक्का होता; पण गेल्या काही महिन्यांमध्ये लग्नाच्या तोंडावर नाते तुटण्याच्या प्रकारामध्ये मागील काही दिवसांमध्ये झालेली वाढ ही चिंताजनक आहे.
'भास्कर'ने दिलेल्या वृत्तानुसार इंदूर शहरात १ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या ४० दिवसांच्या कालावधीत तीन हजारांहून अधिक विवाह झाले, त्यापैकी १५० हून अधिक विवाह ऐनवेळी मोडले. यातील बहुतांश लग्न मोडण्यास मुलगा आणि मुलगी यांच्या सोशल मीडियावरील जुन्या पोस्ट्स कारण ठरल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये जुने प्रेमसंबंध समोर आले, तर काहींमध्ये वागणुकीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. अनेक कुटुंबांनी नेमके कारण सांगणे टाळले. ही नाती तुटल्याने दोन्ही कुटुंबांना धक्का तर बसलाच, शिवाय ॲडव्हान्स बुकिंग केलेल्या वेडिंग प्लॅनर, हॉटेल, गार्डन, केटरर, बँड-बाजा, डेकोरेटर, मेकअप आर्टिस्ट इत्यादींनाही मोठे नुकसान सोसावे लागले आहे. यातील काही उदाहरणे ही बोलकी आहेत.
इंदूरमधील एक तरुणी आणि गुजरातमधील तरुणाचा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस विवाह निश्चित झाला होता. प्री-वेडिंग शूटसाठी तरुण इंदूरला आला. दोन दिवस इथे राहिल्यानंतर सोशल मीडियावरील जुन्या पोस्ट्सवरून दोघांमध्ये वाद झाला. मुलगा गुजरातला परतला आणि त्याने लग्नाला नकार दिला. तोपर्यंत लग्नाचे सर्व बुकिंग झाले होते.
इंदूर बायपासवरील एका मोठ्या हॉटेलमध्ये भव्य विवाहसोहळा आयोजित केला होता. केवळ सजावटीवर सुमारे एक कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. दोन दिवसांच्या कार्यक्रमात पहिल्या दिवशी संगीत कार्यक्रम झाला. त्याच रात्री मुलगी निघून गेली. दुसऱ्या दिवशी लग्न रद्द करावे लागले. नंतर कळले की तिचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध होते.
केसर बाग येथील विठ्ठल रुक्मिणी गार्डनमध्ये एका महिन्यात तीन विवाह कार्यक्रम रद्द झाले आहेत. येथील संचालकांनी सांगितले की, काहींनी ८ दिवस, तर काहींनी १५ दिवस आधी कार्यक्रम रद्द केले. कौटुंबिक वाद तसेच निधन किंवा आजारपण यांमुळेही विवाह ऐनवेळी रद्द झाले.
इंदूर हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष सुमित सूरी यांच्या मते, ४० दिवसांत १५० विवाह रद्द झाल्यामुळे वेडिंग इंडस्ट्रीचे सुमारे २५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बुकिंगच्या रकमेवरून वादही होतात आणि ऐनवेळी कार्यक्रम रद्द झाल्यामुळे नवीन बुकिंग मिळणेही शक्य होत नाही. बहुतेक व्यवहार हे तोंडी झालेले असतात, त्यामुळे नुकसान सोसावेच लागते.
गेल्या ५ वर्षांत विवाहापूर्वी नाते तुटण्याच्या (प्री-मॅरेज ब्रेकअप) संख्येत सतत वाढ होत आहे. ६० ते ७० टक्के प्रकरणांमध्ये सोशल मीडिया हेच नाते तुटण्याचे कारण ठरत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅटसह इतर ॲप्सवरील जुन्या पोस्ट्स, कमेंट्स, लाईक्स, इमोजी आणि फ्रेंड लिस्ट देखील नातेसंबंध तोडण्यास कारणीभूत ठरत आहेत. तरुण आणि तरुणीने एकमेकांचा 'भूतकाळ' तपासल्यामुळेही मतभेद होतात. पूर्वी हुंडा आणि इतर आर्थिक कारणांमुळे नाते तुटत असत, पण आता सोशल मीडिया हे मुख्य कारण बनले आहे. विवाहापूर्वीची जीवनशैलीही सोशल मीडियावर पाहिली जाते आणि त्यातून अनेक नाती तुटत असल्याचे वास्तव आहे.