

वराने लग्नानंतर क्रिकेट सामने पाहण्यासाठी केला एक करारनामा
अनोखे करार वाचनाचा क्षण मित्रांनी केला कॅमेऱ्यात कैद
सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल
Bride reads groom's 'Dhoni-CSK match contract
नवी दिल्ली : महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) हे नाव उच्चारलं की, भारतीय क्रिकेटच्या सुवर्ण इतिहासाचं डोळ्यासमोर येतो. आपल्या हेलिकॉप्टर शॉटने चाहत्यांची मने जिंकणारा धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी आजही त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. असाच धोनीचा कट्टर चाहता असलेल्या नवरदेवाने धोनी-चेन्नई (CSK) आणि आरसीबी (RCB) च्या मॅच पाहण्यासाठी चक्क एक 'करारनामा' तयार केला. आपल्याला आयुष्यभर या मॅचेस पाहण्याची परवानगी मिळेल याची हमी त्याने घेतली. विशेष म्हणजे, हा करार वधूने मंडपात बसून मोठ्याने वाचला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
ध्रुव मजेठिया नावाच्या नवरदेवाने नववधूबरोबर सात फेरे घेण्यापूर्वी एक खास करार आपल्या भावी पत्नी वधू आशिमा हिच्याकडे दिला. तिने फेरे घेण्यापूर्वी मंडपात बसून तो करार वाचला. यावेळी ध्रुवच्या मित्रांनी हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ध्रुवने गंमत म्हणून या कराराच्या शेवटी स्वतःची ओळख "धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जचा एक समर्पित चाहता आणि थोडासा घाबरलेला नवरदेव" अशी करून स्वाक्षरी केली आहे.
नवरदेव ध्रुवने आपली भावी वधू आशिमाकडून वाचून घेतलेल्या करारामध्ये नमूद केले आहे की, 'मी, ध्रुव मजेठिया, स्वाक्षरी करणारा नवरदेव, याद्वारे घोषित करतो की, आशिमाने भविष्यातील एमएस धोनी आणि सीएसके (CSK) तसेच आरसीबी (RCB) च्या सर्व मॅचेसना उपस्थित राहण्याची परवानगी दिली, तर मी आनंदाने, उत्साहाने आणि कोणत्याही पुढील वाटाघाटीशिवाय तिच्यासोबत सात फेरे घेईन. हा करार कायदेशीररित्या बंधनकारक होईल. लग्नानंतर मॅच पाहण्यासाठी बाहेर जाण्याची परवानगी रद्द केल्यास त्याला "कराराचा भंग" (Breach of contract) मानले जाईल, असा इशाराही त्याने दिला आहे. आशिमाने हा करार वाचत असताना, लग्नाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी टाळ्या वाजवून आणि हसून या जोडप्यासाठी जल्लोष केला.
ध्रुवने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे: "सात फेऱ्यांपूर्वीचा करार. तिला आयुष्यभरासाठी मी मिळतो, आणि मला आयुष्यभरासाठी 'थाला' (धोनी) आणि CSK मॅचेस मिळतात. योग्य व्यवहार आहे, नाही?". ध्रुवने धोनीची भेट घेतल्याचा फोटोही इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.