राष्ट्रीय

एनडीएच्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींना जगभरातून शुभेच्छा; मेलोनींपासून मुइज्‍जूंपर्यंत नेते काय म्‍हणाले?

निलेश पोतदार

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन लोकशाहीच्या महान उत्सवाचा जनादेश काल निघाला. अर्थातच निकालांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केले. अखेर एनडीएला बहुमत मिळाले आणि भाजपने तिसऱ्यांदा विजयाची हॅट्ट्रिक साधली. लोकसभा निवडणुकीत एनडीएने 290 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. सलग तिसऱ्यांदा NDA सरकार स्थापन होणार असल्‍याने जगभरातील अनेक नेत्यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे.

निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालय गाठून विजयाबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या. विजयाची घोषणा होताच पंतप्रधान मोदींवर देश-विदेशातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. त्‍याच बरोबर जगभरातील नेत्‍यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा निवडणुकीत विजय मिळवून मोठा पक्ष बनल्‍याने शुभेच्छा दिल्‍या.

इटलीच्या पंतप्रधानांनी केले अभिनंदन

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींचे विजयाबद्दल अभिनंदन केले. यासोबतच त्यांनी पीएम मोदींसोबतचा हसतमुख फोटोही शेअर केला आहे. जॉर्जिया मेलोनी यांनी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये दोन्ही पंतप्रधान हसताना आणि हस्तांदोलन करताना दिसत आहेत. हे चित्र G-20 परिषदेचे आहे, जेव्हा जॉर्जिया मेलोनी स्वतः भारतात आल्‍या होत्‍या.

शेअर केली पोस्ट

या छायाचित्रासोबत पीएम मेलोनी यांनी लिहिले की, नरेंद्र मोदी यांच्या निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. आपण यापुढेही एकत्र काम करत राहू. यामुळे आमची मैत्री आणखी घट्ट होईल. तसेच, अनेक मुद्द्यांवर परस्पर सहमतीने निर्णय घेण्याची इटली आणि भारताची वचनबद्धता दोन्ही देशांसाठी आणि आपल्या लोकांसाठी अधिक चांगली असल्याचे सिद्ध होईल.

पीएम मोदी यांनी मानले आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे आभार मानले आहेत. जॉर्जिया मेलोनींच्या ट्विटला उत्तर देताना पीएम मोदींनी लिहिले की, तुमच्या शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद. भारत आणि इटली यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी कायम राहील. जगाच्या भल्यासाठी आपण एकत्र काम करू.

मालदीव अध्यक्षांच्या शुभेच्छा

मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी X वर लिहिले, 2024 च्या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा यशस्वी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि NDA यांचे अभिनंदन. दोन्ही देशांच्या सामायिक समृद्धीसाठी मी एकत्र काम करण्यास उत्सुक असल्याचे ते म्हणाले.

भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे म्हणाले…

भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे म्हणाले की, ते भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक आहेत. ते म्हणाले की, जगातील सर्वात मोठ्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल माझे मित्र पंतप्रधान मोदी आणि एनडीएचे अभिनंदन. ते भारताला नव्या उंचीवर नेत आहे. आपल्या दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी मी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.

श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघें यांच्याकडून अभिनंदन

श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले, एनडीएच्या विजयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनतेने प्रगती आणि समृद्धीवर विश्वास दाखवला आहे. श्रीलंका, आपला सर्वात जवळचा शेजारी असल्याने, भारतासोबतची भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी उत्सुक आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT