Lok Sabha Election 2024 Results : आंध्रमध्ये चंद्राबाबूंची सत्तावापसी

Lok Sabha Election 2024 Results : आंध्रमध्ये चंद्राबाबूंची सत्तावापसी

अमरावती, वृत्तसंस्था : तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) नेते एन. चंद्राबाबू नायडू यांनी तब्बल 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा आंध्र प्रदेशची सत्ता हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. भारतीय जनता पक्ष आणि अभिनेता पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाबरोबर आघाडी करत त्यांनी युवाजन श्रमिका रयथु (वायएसआर) काँग्रेसचे नेते एस. जगनमोहन रेड्डी यांच्या सत्तेला सुरूंग लावला.

त्यांची बहीण वाय. एस. शर्मिला रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली रिंगणात उतरलेल्या काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. दरम्यान, भाजपला प्रथमच आंध्र प्रदेशमध्ये सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.

आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. एकूण 175 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत बहुमतासाठी 88 जागांची आवश्यकता होती. टीडीपी, जनसेना आणि भाजप या पक्षांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) छत्राखाली एकत्रित निवडणूक लढविली; तर वायएसआर काँग्रेस आणि इंडियन नॅशनल काँग्रेस यांनी 'एकला चलो रे'चा मार्ग अवलंबला होता. त्यामध्ये एनडीएने 162 जागा जिंकून आंध्र प्रदेशची सत्ता खेचून आणली.

चंद्राबाबूंच्या टीडीपीने 134 जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली आणि स्पष्ट बहुमत मिळविले. जनसेना पक्षानेही आपल्या मागील कामगिरीत सुधारणा करताना सत्तारूढ वायएसआर काँग्रेसपेक्षाही अधिक जागा जिंकल्या आहेत. जनसेनाला 21, तर वायएसआरला 12 जागांवर विजय मिळाला. जनसेनाने गत निवडणुकीत एक जागा जिंकून खाते उघडले होते. आता तब्बल 21 जागांवर मुसंडी मारली आहे. भारतीय जनता पक्षानेही पहिल्यांदाच 8 जागा जिंकत थाटात सत्तेत प्रवेश मिळविला आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपला खातेही उघडता आले नव्हते.

आंध्र प्रदेशमध्ये 13 मे रोजी लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभेची निवडणूक झाली होती. मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली वायएसआरसीपीने सर्व 175 जागा लढविल्या होत्या. एन. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली टीडीपीने 144 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. याशिवाय अभिनेता पवन कल्याणच्या नेतृत्वाखालील जनसेना पक्षाने (जेएसपी) 21 जागा लढविल्या होत्या. भाजपने दहा जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत 175 जागांसाठी 2,387 उमेदवार रिंगणात होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या विजयाबद्दल चंद्राबाबू यांचे अभिनंदन केले आहे.

… जेव्हा रडले होते चंद्राबाबू

19 नोव्हेंबर 2021 रोजी एका पत्रकार परिषदेत चंद्राबाबू नायडू रडले होते. त्यानंतर त्यांनी शपथ घेतली होती की, जोपर्यंत ते राज्य विधानसभा निवडणूक जिंकत नाहीत, तोपर्यंत विधानसभेत पाय ठेवणार नाही. पत्नीवर करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला होता.

जगनमोहन रेड्डींचा राजीनामा; चंद्राबाबूंचा शपथविधी रविवारी

पक्षाच्या दारुण पराभवानंतर वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी संध्याकाळी 4 वाजता राज्यपाल एस. अब्दुल नजीर यांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता एन. चंद्राबाबू नायडू हे 9 जून रोजी अमरावती येथे चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यापूर्वी त्यांनी सासरे एन. टी. रामाराव यांच्या विरोधात बंड केल्यानंतर 1995 ते 2004 तसेच 2014 ते 2019 या कालावधीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. पंतप्रधान नरेेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दूरध्वनीवरून त्यांचे अभिनंदन केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news