राष्ट्रीय

Parliament Winter Session : अमित शहा -राहुल गांधींमध्ये शाब्दिक चकमक

दोन्‍ही नेत्‍यांमधील आव्‍हान आणि प्रतिआव्‍हाने लोकसभेचे कामकाज चांगलेच तापले

पुढारी वृत्तसेवा

Parliament Winter Session :

नवी दिल्‍ली: बुधवारी लोकसभेच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. राहुल गांधी यांनी थेट एकत्र पत्रकार परिषदेत चर्चा करु असे आव्‍हान दिले. तर तुमच्‍या मर्जीनुसार संसद चालणार नाही, असे शहा यांनी यावेळी सुनावले. दोन्‍ही नेत्‍यांमधील आव्‍हान आणि प्रतिआव्‍हाने सभागृहातील वातावरण काही काळ चांगलेच तापले.

'तुम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये या': राहुल गांधींचे थेट आव्हान

विरोधकांच्या EVM वरील प्रश्नांना उत्तर देत असताना अमित शहा म्हणाले की, ते विरोधी पक्षनेत्यांनी घेतलेल्या 'एक साधी, एक अणुबॉम्ब (एटम बॉम्ब) आणि एक हायड्रोजन बॉम्ब (Hydrogen Bomb) वाली' अशा तिन्ही पत्रकार परिषदांना उत्तर देतील. यावर काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तत्काळ शहा यांच्‍या विधानावर आक्षेप घेतला. राहुल गांधी म्हणाले, "हा एक चांगला विचार आहे. आपण पत्रकार परिषदेतच चर्चा करूया. मी तुम्हाला यासाठी आव्हान देतो." तसेच, "भारताच्या इतिहासात प्रथमच निवडणूक आयुक्तांना इतकी संपूर्ण अधिकार कशासाठी दिला जात आहे? यामागचा विचार काय आहे, हे त्यांनी आधी स्पष्ट करावे," असा प्रतिसवालही त्यांनी केला.

'तुमच्या मर्जीनुसार संसद चालणार नाही': अमित शहांनी सुनावले

या आव्हानानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाद-विवाद पाहायला मिळाला. अमित शहा यांनी संसदीय कार्यप्रणालीचा दाखला देत म्‍हणाले, "मी ३० वर्षांपासून विधानसभा आणि संसदेत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो आहे. मला संसदीय प्रणालीचा मोठा अनुभव आहे. विरोधी पक्षनेते म्हणतात की, आधी माझ्या बोलण्याचे उत्तर द्या; पण तुमच्या मर्जीनुसार संसद चालणार नाही. माझ्या बोलण्याचा क्रम मी ठरवेन. या पद्धतीने संसद चालणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.शहा पुढे म्हणाले, "मी त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देईन, पण माझ्या भाषणाचा क्रम ते ठरवू शकत नाहीत. त्यांनी संयम बाळगला पाहिजे, असे आवाहनही त्‍यांनी केली.

'गृहमंत्री घाबरले आहेत': राहुल गांधींचा पलटवार

अमित शहांच्या या प्रतिक्रियानंतर राहुल गांधींनी लगेच पलटवार करत म्हटले की, "तुम्ही गृहमंत्र्यांचे उत्तर ऐकले असेल, तर हे त्यांचे घाबरलेले (डरा हुआ) उत्तर आहे. ते घाबरलेले आहेत." यावर अमित शहांनीही प्रत्युत्तर दिले. "मी तुमच्या (राहुल गांधींच्या) चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा पाहिल्या आहेत. तुम्‍ही मला कितीही प्रक्षोभक करण्‍याचा प्रयत्‍न केला तरी येणार नाही; पण मी माझ्या क्रमानेच बोलेन. माझे भाषण माझ्या क्रमानुसारच चालेल." तरीही, "ते विरोधी पक्षनेते आहेत, म्हणून त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. ते असे का बोलत आहेत हे मी समजू शकतो, पण त्यांनी आमचेही ऐकले पाहिजे. काल आम्ही उभे राहून तुम्ही खोटे बोलत आहात, असे म्हटले नव्हते," असा टोला अमित शहांनी शेवटी लगावला.

राजीव गांधींनी आणलेल्या EVM वर काँग्रेसचा आक्षेप का? : अमित शहांचा हल्लाबोल

नवी दिल्ली: 1989 मध्ये राजीव गांधी सरकारच्या काळात आणलेल्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) वर काँग्रेसने आक्षेप का घ्यावा?, असा सवाल करत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स (EVM) आणि व्हीव्हीपॅट (VVPAT) डेटावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विरोधी पक्षांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज जोरदार टीका केली. ईव्‍हीएममुळे निवडणुका निष्पक्षपणे पार पडतात, असा पुन्‍नरुच्‍चारही त्‍यांनी केला.

भाजपच्‍या पराभवानंतर ईव्‍हीएमवर आक्षेप का घेतला नाही?

आज (दि.१० डिसेंबर) लोकसभेत 'एसआयआर' (SIR) विषयावरील चर्चेदरम्यान बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षांना लक्ष्य केले. त्यांनी असा सवाल केला की, 2004 आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकांचा संदर्भ देत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. "जेव्हा भाजपचा पराभव झाला, तेव्हा काँग्रेसने कधीही आक्षेप घेतला नाही," असे सांगून त्यांनी विचारले, "2014 नंतरच त्यांचा 'रडण्याचा' कार्यक्रम का सुरू झाला?"

निवडणूक सुधारणेबाबत काँग्रेसकडून एकही सूचना नाही

अमित शहा यांनी लोकसभेत काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, मे 2014 पासून काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे निवडणूक सुधारणांशी संबंधित एकही सूचना केलेली नाही किंवा आयोगाकडे संपर्क साधलेला नाही. शहा यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी खासदारांनी जोरदार गदारोळ केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT