नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सहारा समुहाशी संबंधित नऊ कंपन्यांविरोधात SFIO (Serious Fraud Investigation Office) कडून सुरू असलेला तपास थांबवण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी रद्द केला. SFIO कडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमुर्ती बेला एम. त्रिवेदी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. या निर्णयामुळे सहारा समूहाशी संबंधित कंपन्यांविरोधात तपासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
सहारा समूहाशी संबंधित नऊ कंपन्यांविरुद्ध SFIO च्या चौकशीला स्थगिती देण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाने १३ डिसेंबर २०२१ ला आदेश दिला होता. या आदेशाविरोधात SFIO ने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर कार्यालयाच्या सर्व कारवाईवर रोक लावण्यात आली होती. सोबत कार्यालयाकडून संबंधित कंपन्यांच्या तपासासंबंधी देण्यात आलेल्या दोन आदेशाच्या संचालन आणि क्रियान्वयावर देखील रोक लावण्यात आली होती. न्यायालयाच्या या निर्णयानंतर सहारा समूहाशी संबंधित कंपन्यांविरोधात तपासाचा मार्ग मोकळा असुन उच्च न्यायालयाने दिलेला निकाल योग्य नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष खंडपीठाने नोंदवला आहे.
हेही वाचलंत का?