पुणे/धायरी : पुढारी वृत्तसेवा
अनैतिक संबंधांतून जन्माला आलेल्या एका अर्भकाला त्याच्या आईनेच प्रियकराच्या मदतीने सार्वजनिक शौचालयाच्या भांड्यात टाकून दिल्याचा भीषण प्रकार उघडकीस आला; मात्र, पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन या बाळाचा जीव वाचविला.
सिंहगड रोड परिसरातील वडगाव बुद्रुक येथील तुकाईनगरमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी बजाविलेल्या कामगिरीमुळे त्यांचे सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. तुकाईनगरच्या सार्वजनिक महिला शौचालयात एक महिला या अर्भकाला टाकून निघून गेली. त्यानंतर शौचालयात गेलेल्या दुसर्या महिलेला बाळाचा रडण्याचा आवाज आला. तिने तत्काळ पोलिस कंट्रोल रूमला सकाळी आठ वाजता याची माहिती दिली.
सिंहगड पोलिस ठाण्यात ड्युटीवर असलेले पोलिस अंमलदार अजय माळी व अमोल कट्टे यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहणी करताच त्यांना त्या शौचालयातील भांड्यात अर्भक रडत असल्याचे आढळले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नागरिकांच्या मदतीने हे चिमुकले बाळ भांड्यातून वर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अर्धे भांड्यात, तर अर्धे लाईनमध्ये अडकले असल्यामुळे त्याला बाहेर काढणे मुश्कील होते. त्यातच बाळाला जखम झाल्याने रक्तस्रावदेखील होत होता. शेवटी कर्मचार्यांनी तेलाचा वापर करून त्या बाळाला भांड्यातून बाहेर काढत त्याचा जीव वाचविला. बाळाला पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वरिष्ठ अधिकारी, तसेच सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली व अंमलदार माळी व कट्टे यांचे अभिनंदन केले. या निर्दयी प्रकारामुळे तुकाईनगर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या निर्दयी महिलेला व तिला साथ देणार्या तिच्या प्रियकराला ताबडतोब अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिस त्याचा तपास करत आहेत. हे अर्भक मुलगा असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस अंमलदार अजय माळी यांनी महिलेविरुद्ध कायदेशीर फिर्याद दिली आहे.
https://youtu.be/m5yyfqkYqY4