पर्यावरणासाठी केलेल्‍या लक्षणीय कार्याबद्दल 'इंटरनॅशनल ॲडव्हर्टायझिंग असोसिएशन' (IAA) आणि रमेश नारायण यांना 'अर्थ डे डॉट ओआरजी'ने सन्मानित केले आहे. 
राष्ट्रीय

Olive Crown Awards | "पृथ्वीलाही ब्रँड समजा!"; रमेश नारायण यांनी उलगडला 'ऑलिव्ह क्राउन'चा १५ वर्षांचा यशस्वी वाटचालीचा प्रवास

पर्यावरण रक्षण संदेशाला मिळाली नोबेल विजेत्यांपासून महानायकांपर्यंत भक्कम साथ

पुढारी वृत्तसेवा

Olive Crown Awards

मुंबई : "संवाद हे केवळ माहिती देण्याचे साधन नसून ते सकारात्मक बदलाचे प्रभावी शस्त्र आहे," असा दृढ विश्वास बाळगणारे जाहिरात क्षेत्रातील दिग्गज रमेश नारायण यांनी १५ वर्षांपूर्वी एक स्वप्न पाहिलं. आपण ज्या वसुंधरेवर राहतो त्याच आपल्या धरतीमाता पृथ्वीलाच एक 'ब्रँड' मानून, तिच्या संवर्धनासाठी जनसामान्यांमध्ये जागृती निर्माण करण्याचे हे स्वप्न होते. याच स्वप्नातून 'इंटरनॅशनल ॲडव्हर्टायझिंग असोसिएशन'च्या (IAA) भारतीय शाखेच्या माध्यमातून 'ऑलिव्ह क्राउन पुरस्कार' ही संकल्पना साकारली गेली. आज हा पुरस्कार १५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. प्रभावी संवादाच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या आणि शाश्वततेचा विचार करणाऱ्या उद्योजकांना सन्मानित करणारा हा आशियातील पहिला आणि एकमेव पुरस्कार आहे. या पुरस्कारांच्या सुरुवातीच्या संघर्षापासून ते जागतिक स्तरावर मिळालेल्या मान्यतेपर्यंतचा प्रवास रमेश नारायण यांनी एका विशेष मुलाखतीत उलगडला.

संवाद हेच सकारात्मक बदलाचे साधन : रमेश नारायण

'संवाद' हे नेहमीच विधायक आणि सकारात्मक बदलाचे एक साधन आहे, यावर माझा नितांत विश्वास आहे. २००८ मध्ये IAA च्या भारतीय शाखेच्या कार्यक्रमात डॉ. राजेंद्र पचौरी यांचे भाषण झाले, तेव्हा पुढील बैठकीला जाण्यापूर्वी त्यांच्याकडे थोडा मोकळा वेळ होता. त्यावेळी IAA चे अध्यक्ष असलेल्या प्रदीप गुहा यांनी मला डॉ. राजेंद्र पचौरी यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले. आमच्या १५ मिनिटांच्या चर्चेत डॉ. पचौरी यांनी मला त्यांच्या एका स्वप्नाविषयी सांगितले: भारतातील ७०,००० हून अधिक गावे अशी होती जिथे विजेची सोयच नव्हती; त्या गावांमध्ये राहणाऱ्या कोट्यवधी लोकांचे जीवन प्रकाशमान करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यांच्यासमोरील एकमेव अडचण अशी होती की, ही समस्या लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे आणि या समस्येवर उपाय शोधण्यासाठी निधी उभारण्याचे कोणतेही साधन त्यांच्याकडे उपलब्ध नव्हते.

अशी रोवली गेली ऑलिव्ह क्राउन पुरस्कारांची मुहूर्तमेढ

रमेश नारायण यांनी सांगितले की, "२००८ मध्ये जाहिरात विश्वात 'शाश्वतता' या संकल्पनेला फारसे महत्त्व नव्हते. त्याच वर्षी डॉ. राजेंद्र पचौरी यांच्याशी झालेल्या १५ मिनिटांच्या चर्चेतून शाश्वत विकासासाठीच्या पुरस्काराची संकल्पना सुचली. भारतातील दुर्गम भागातील ७०,००० गावांत वीज पोहोचवण्याच्या 'लायटिंग अ बिलियन लाइव्ह्ज' या डॉ. पचौरींच्या मोहिमेला जाहिरात क्षेत्राची साथ देण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोहिमेसाठी कुमारमंगलम बिर्ला, पीयूष पांडे, शोभा डे यांसारख्या दिग्गजांचे परीक्षक मंडळ नेमण्यात आले होते. यातूनच शाश्वततेचा विचार प्रबळ झाला आणि ऑलिव्ह क्राउन पुरस्कारांची मुहूर्तमेढ रोवली गेली.

'गोवा फेस्ट'ने तारले

पुरस्कारांच्या पहिल्या आवृत्तीच्या वेळी प्रायोजक मिळवण्यात अडचणी आल्या. "आपण हे कार्यक्रम पुढे ढकलले तर ते एखाद्या 'जन्मताच मृत पावलेल्या बाळा'सारखे ठरेल," अशा शब्दांत आपण आपली भूमिका स्पष्ट केल्याचे रमेश नारायण नम्रपणे नमूद केले होते. अखेर, प्रदीप गुहा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लिन डिसूझा यांच्या सहकार्याने 'गोवा फेस्ट'च्या मंचावरून या पुरस्कारांची सुरुवात झाली. उद्योगांतर्गत सहकार्य आणि समन्वयाचे हे एक उत्तम उदाहरण ठरले.

नैतिकतेची जोपासना आणि 'ग्रीन क्रुसेडर'चा गौरव

रमेश नारायण यांनी पुरस्कारांची विश्वासार्हता टिकवण्यासाठी नेहमीच नैतिक मूल्यांना प्राधान्य दिले. प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या कंपन्यांचे प्रायोजकत्व नाकारून त्यांनी या पुरस्कारांना एक वेगळी ओळख दिली. दुसऱ्याच वर्षी, त्यांनी 'ग्रीन क्रुसेडर ऑफ द इयर' हा पुरस्कार सुरू केला. नोबेल विजेते डॉ. राजेंद्र पचौरी यांना प्रत्यक्ष दिल्लीला जाऊन भेटून, त्यांना मुंबईत या पुरस्कारासाठी निमंत्रित करण्याची जिद्द रमेश नारायण यांनी दाखवली होती, जी यशस्वीही ठरली.

अमिताभ बच्चन ते सद्गुरू: दिग्गजांची उपस्थिती

गेल्या १४ वर्षांत या पुरस्कार सोहळ्याला अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती लाभली आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, जॉन अब्राहम, दिया मिर्झा, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, प्रफुल्ल पटेल, मेनका गांधी आणि सद्गुरू यांचा समावेश आहे. शंकर महादेवन आणि शान यांच्यासारख्या कलाकारांनीही आपल्या गायनाने या 'चांगल्या उद्देशाला' समृद्ध केले आहे.

IAA आणि रमेश नारायण पर्यावरणासाठी कार्याबद्दल सन्मानित

यंदाच्या १५ व्या वर्षात 'ऑलिव्ह क्राउन पुरस्कारां'ना विक्रमी संख्येने प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे, जगातील सर्वात मोठ्या पर्यावरण चळवळी 'अर्थ डे डॉट ओआरजी' (Earthday.org)ने 'इंटरनॅशनल ॲडव्हर्टायझिंग असोसिएशन'च्या (IAA) आणि रमेश नारायण यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना 'मार्कॉम' क्षेत्रात पर्यावरणासाठी सर्वाधिक कार्य केल्याबद्दल सन्मानित केले आहे.

... तेव्हा मदतीची दारे आपोआप उघडली जातात

जेव्हा आपण चांगल्या उद्देशासाठी काम करतो, तेव्हा मदतीची दारे आपोआप उघडली जातात, असे आपल्या आजवरच्या प्रवासावर भाष्य करताना रमेश नारायण म्हणतात. आज ४ एप्रिल रोजी होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याने या पुरस्कारांना केवळ भारतातीलच नव्हे, तर जागतिक स्तरावरील एका मानाच्या उपक्रमाच्या यादीत स्थान मिळवून दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT