

ठाणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील नौपाडा भागातील बेडेकर शाळेतील विद्यार्थ्यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. गणेशोत्सवात तयार होणार्या निर्माल्याच्या व्यवस्थापनासाठी या विद्यार्थ्यांनी घरगुती पातळीवरच पर्यावरणपूरक उपाय शोधत वर्तमानपत्रांपासून सुमारे 700 ते 800 कागदी पिशव्या तयार केल्या आहेत. या पिशव्या शहरातील गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये तसेच परिसरातील घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये वाटप करण्यात आल्या.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे ही आजच्या काळाची गरज आहे. प्लास्टिकचा वापर टाळून नैसर्गिक साधनसंपत्तीचं संरक्षण करणं, नदी-नाल्यांचं प्रदूषण रोखणं आणि पर्यावरणाचा समतोल राखणं यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गणेशोत्सव हा लाखो भाविकांमध्ये श्रद्धा व भक्तीचा विषय असतानाच, त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम विचारात घेणे देखील तितकेच आवश्यक आहे.
फुलं, हार, दुर्वा आणि नैवेद्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य तयार होते. हे निर्माल्य अनेकदा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये साठवले जात असल्यामुळे त्याचे योग्य व्यवस्थापन होणे कठीण जाते आणि त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. हीच बाब लक्षात घेऊन बेडेकर शाळेतील स्काऊट आणि गाईड विभागातील विद्यार्थ्यांनी शाळेच्या शिक्षिका कल्पना बोरवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या पिशव्या तयार केल्या.
पर्यावरण जपण्यासाठी उपक्रम
या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी प्लास्टिकला नाही, पर्यावरणपूरक सणांना होकार असा संदेश समाजात पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. मूर्तीकारांनाही या पिशव्या गणेशभक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी सांगण्यात आले. हा उपक्रम म्हणजे पर्यावरण जपण्याच्या दिशेने टाकलेलं महत्त्वपूर्ण पाऊलच म्हणावं लागेल.
शाळांनीही उपक्रम राबवावेत
अशा प्रकारचे उपक्रम शहरातील इतर शाळांनीही राबवावेत आणि भाविकांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.