Noida heartbreaking Car Accident
नोएडा: येथील सेक्टर १५० जवळ शुक्रवारी (दि. १६) रात्री एका २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. दाट धुके आणि रस्त्यावरील नियोजनाच्या अभावामुळे युवराज मेहता यांची कार नाल्याच्या संरक्षक भिंतीला धडकून ७० फूट खोल पाण्यात कोसळली. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
मूळचा बिहारच्या सीतामढीचा असलेला युवराज गुडगावमधील एक खासगी कंपनीत नोकरीला होता. शुक्रवारी रात्री कामावरून घरी परतत असताना दाट धुक्यामुळे त्याची कार एका ७० फूट खोल पाण्याच्या खड्ड्यात कोसळली. त्यावेळी त्याने आपल्या वडिलांना फोन केला. तिथून जाणाऱ्या काही नागरिकांनी युवराज यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून मदतीचा प्रयत्न केला, मात्र कार पूर्णपणे पाण्यात बुडाली होती.
कार पाण्यात बुडत असताना युवराज यांनी आपले वडील राजकुमार मेहता यांना फोन केला होता. त्यांनी या भीषण प्रसंगाबाबत माध्यमांशी बोलताना त्यांच्या अश्रूचा बांध पुटला. रडत रडत ते म्हणाले, "बाबा, मी एका खोल पाण्याच्या खड्ड्यात पडलो आहे. मी बुडतोय, प्लीज मला वाचवायला या. मला मरायचं नाहीये." हा युवराजबरोबरील माझा शेवटचा संवाद ठरला. "मी त्याला वाचवण्यासाठी जीवाचे रान केले, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते."
"पोलीस आणि बचाव पथक १५ मिनिटांत पोहोचले, पण माझ्या मुलाला बाहेर काढण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी साधने नव्हती," असा आरोप राजकुमार यांनी केला आहे. मुलाला वाचवण्यासाठी ते रात्रभर इकडून तिकडे धावत होते. दरम्यान, मोनू नावाच्या एका फ्लिपकार्ट डिलिव्हरी एजंटने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता युवराजला वाचवण्यासाठी खड्ड्यात उडी घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पाच तासांच्या बचावकार्यानंतर युवराजला बाहेर काढण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
युवराजने अत्यंत कष्ट करून आपले करिअर घडवले होते. दोन वर्षांपूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले होते, तर त्याची बहीण सध्या ब्रिटनमध्ये राहते. आईच्या निधनानंतर तो आपल्या वडिलांचा मोठा आधार होता, मात्र या अपघाताने सर्व काही हिरावून घेतले आहे.
हा अपघात नोएडातील सेक्टर १५० जवळ घडला. या रस्त्यावर ना रिफ्लेक्टर्स होते ना उघड्या नाल्यांवर झाकणे. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली गेली नाही. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध निदर्शने केली. धक्कादायक म्हणजे, हा भीषण अपघात झाल्यानंतर तातडीने उपाययोजना करण्याऐवजी प्रशासनाने तो खड्डा कचरा आणि ढिगाऱ्याने भरून टाकला आहे.