

जळगाव : जळगाव-चोपडा मार्गावरील तापी नदीवरील विदगाव पुलावर मंंगळवार (दि.30) रोजी रात्री उशीरा भरधाव वेगाने येणाऱ्या अवैध वाळूच्या डंपरने एका चारचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आई व मुलाचा मृत्यू झाला असून वडील आणि त्यांचा दुसरा मुलगा देखील गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातात विठ्ठल नगरचे रहिवासी व धानोरा येथील शिक्षक निलेश चौधरी यांची पत्नी मीनाक्षी चौधरी (शिक्षिका, जळगाव) आणि मुलगा पार्थ यांचा जागीच मृत्यू झाला. तर निलेश चौधरी आणि त्यांचा दुसरा मुलगा ध्रुव हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भीषण अपघातात चारचाकी थेट पुलावरून हवेत उडून थेट नदीपात्रातील वाळूवर आदळली. या दुर्घटनेने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय गायकवाड व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, जिल्ह्यात पुन्हा एकदा अवैध वाळू वाहतुकीमुळे जीवितहानी झाल्याचे सांगण्यात येत असून संताप व्यक्त केला जात आहे. तर बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर आळा घालण्याची मागणी जोर धरत आहे.