New Two Wheeler Norms hands free safety system: देशात सध्या प्रीमियम परफॉर्मन्स बाईकचं मार्केट चांगलेच फोफावत आहे. अनेक तरूण तरूणी हाय स्पीड बाईक्सचे दिवाने झाले आहेत. सोशल मीडियावर रील्स आणि शॉर्टच्या नादात ही तरूणाई या अत्यंत वेगवान बाईक्सवर हँडलवरचे हात सोडून बाईक चालवण्याचे स्टंट करतात. अशा स्टंटचा सध्या सोशल मीडियावर सुरसुळाट झाला आहे. रायडिंग व्हिडिओच्या नावाखाली मुलं अन् मुली देखील असे स्टंट करून आपला जीव धोक्यात घालत आहेत.
मात्र आता हे चित्र बदलणार आहे. सरकार आता टू व्हीलर्ससाठी नवीन तीन स्तरीय हँड्स फ्री सेफ्टी सिस्टम आणण्याची योजना आखत आहे. या सिस्टमद्वारे बाईक उत्पाक कंपनीच तुमच्या गाडीत ही सिस्टम इन्स्टॉल करून देईल. यात रायडरचे दोन्ही हात हँडलवर आहेत की नाही याची खात्री ही सिस्टम करेल. जर नसतील तर ही सिस्टम कार्यान्वित होईल. ही सिस्टम देशात रस्ते अपघात वाढत असल्यानं आणण्याची गरज भासत आहे.
द मिंटने दिलेल्या माहितीनुसार सध्या सरकारमध्ये असा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यानुसार जर दोन्ही रायडर्सचे हात हँडलवर नसतील तर तुमच्या बाईक आणि स्कूटरचे इग्निशनच होणार नाही. तसेच रायडिंगवेळी तुम्ही हँडलवरून हात हटवाल त्यावेळी श्राव्य आणि दृष्य माध्यमातून अलर्ट देण्यात येईल. जर तरी तुम्ही हँडलवर हात ठेवला नाही तर गाडी हळूहळू वेग कमी करेल.
आता जर सरकारने हे टू व्हीलर्ससाठीचे नवे सुरक्षा नियम स्टँडर्ड करत लागू केले तर बाईक आणि स्कूटर निर्मात्या कंपन्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. हा खर्च सहाजिकत ग्राहकाच्या खिशातून जाणार आहे. प्रस्तावित नॉर्म्समुळं बाईक किंवा स्कूटरच्या किंमतीत १८०० ते १००० रूपयांची वाढ होऊ शकते. यासाठी कंपन्यांना हँडलबारमध्ये सेन्सर इन्स्टॉल करावे लागतील अशी माहिती टू व्हीलर्स क्षेत्रातील दोन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.
विशेष म्हणजे आता टू व्हीलर्स सेफ्टी नॉर्म अजून कडक करण्याचे सरकारचे प्लॅनिंग आहे. आता प्रत्येक टू व्हीलरला अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस) बंधनकारक करण्यासाठी सरकार आग्रही आहे. यापूर्वी या क्षेत्रातील कंपन्यांनी याला विरोध केला होता. त्यामुळं इंजिन क्षमतेच्या आधारावर ही सक्ती करण्यात आली.
टू व्हीलर क्षेत्रातील एका उच्च पदस्थ अधिकारी अशीम शर्मा यांनी सांगितलं की, 'टू व्हीलर्समध्ये आपण कोणते कोणते फीचर्स आणू शकतो याबाबत चर्चा करण्यासाठी सरकार जास्त उत्सुक आहे. द ऑटोमेटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड कमिटी नवीन नियमावली आणण्यासाठी आणि हँडलवरचा हात सोडून गाडी चालवण्याच्या प्रकारावर आळा घालण्यासाठी आग्रही आहे.'
ते पुढे म्हणाले, 'मात्र यामुळं टू व्हीलर्सच्या किंमतीत वाढ होणार आहे याचा थेट परिणाम मागणीवर होऊ शकतो. विशेष म्हणजे सध्या इंधनाच्या दरात वाढ होत आहे. दोन्ही मिळून मागणीवर परिणाम करू शकतात अशी शंका बोलून दाखवली आहे.