Missing link project: 1 मेपासून मुंबई- पुणे प्रवास होणार सुस्साट.... ; मिसिंग लिंकचा फायदा काय? पहा फोटो!

Missing link project: 1 मेपासून मुंबई- पुणे प्रवास होणार सुस्साट.... ; मिसिंग लिंकचा फायदा काय? पहा फोटो!

मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' प्रकल्प ः केवळ रस्ता नव्हे जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकीचा नमुना
Published on

प्रोजक्टला नाव मिसींग लिंक

जयंत धुळप (रायगड): सध्याचा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आणि जुना मुंबई-पुणे महामार्ग हे दोन्ही मार्ग खालापूर ते लोणावळा (अडोशी ते खंडाळा) या १० किलोमीटरच्या घाट क्षेत्रात एकमेकांना मिळतात. यामुळे या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी जो नवीन जोडमार्ग तयार केला, त्याला 'मिसिंग लिंक' असे नाव पडले.  मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' प्रकल्प केवळ रस्ता नसून ताे  जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकीचा नमुना ठरला आहे. या मार्गावरील जगातील सर्वात रुंद ८ पदरी  बोगद्याची नाेंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये होण्याचा दावा एमएसआरडीसीने केला आहे.

अभियांत्रिकी वैशिष्ट्ये, सर्वात रुंद बोगदा

या प्रकल्पातील ८.९२ किमी लांबीचा बोगदा हा २३.७५ मीटर रुंद आहे. हा जगातील सर्वात रुंद ८-पदरी (8-lane) बोगदा असल्याचा दावा केला जात असून, याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये होण्याची शक्यता आहे.भारतातील सर्वात उंच केबल-स्टेड पूल: टायगर व्हॅलीवर बांधलेल्या पुलाचे खांब १८२ मीटर उंच आहेत. याची तुलना करायची झाल्यास, वांद्रे-वरळी सी-लिंकच्या खांबांची उंची १२६ मीटर आहे, म्हणजेच हा पूल त्यापेक्षाही ५६ मीटरने उंच आहे.

लोणावळा तलावाखालील बोगदा

या प्रकल्पाचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे बोगद्याचा काही भाग लोणावळा तलावाच्या तळापासून साधारण १८० मीटर खोल जमिनीखालून जातो.ताे अत्याधूनिक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन बांधण्यात आला आहे.

या प्रकल्पाचा खर्च ₹७,५०० कोटी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ६ वर्षे

या प्रकल्पाचा खर्च तांत्रिक आव्हाने आणि विलंबामुळे मूळ खर्च वाढून तो आता ₹७,५०० कोटींच्या घरात गेल्याचे सांगण्यात येते. तसेच या प्रकल्पाच्या कामाला साधारणपणे २०१९ मध्ये सुरुवात झाली होती. सध्या एप्रिल २०२६ अखेरपर्यंत या प्रकल्पाचे ९९% काम पूर्ण झाले असून अंतर्गत सजावट आणि रंगरंगोटी सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी साधारण ६ वर्षांचा कालावधी लागला आहे.

काम करणाऱ्या कंपन्या

हा प्रकल्प MSRDC (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) मार्फत राबविला जात आहे. यातील महत्त्वाच्या पुलाचे आणि टनेलचे काम मुख्यत्वे ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर (Afcons Infrastructure) आणि नवयुगा इंजिनीअरिंग (Navayuga Engineering) यांसारख्या कंपन्यांनी केले आहे.

प्रकल्प उभारणीसाठी कंपन्यांची विभागणी-केबल स्टेड ब्रिज वैशिष्टय

टायगर व्हॅलीवर ६५० मीटर लांबीचा भव्य केबल स्टेड पूल उभारण्यात आला आहे. त्याचे खांब १८२ मीटर उंच आहेत, जे वांद्रे-वरळी सी लिंकपेक्षाही जास्त आहेत. प्रकल्पाचे काम दोन मुख्य पॅकेजमध्ये विभागले गेले होते- पॅकेज १ (बोगदे): नवयुगा इंजिनीअरिंग या कंपनीने दोन मुख्य बोगद्यांचे (१.७५ किमी आणि ८.९२ किमी) काम केले आहे. पॅकेज २ (पूल आणि रस्ता): ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर  या कंपनीने ६५० मीटर आणि ८५० मीटर लांबीच्या पुलांचे  काम पूर्ण केले आहे. मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' प्रकल्प चार वर्षे विलंबाने पूर्ण होत आहे, त्याची मुख्य कारणे कठीण भौगोलिक परिस्थिती: सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील कठीण पाषाण आणि टायगर व्हॅलीतील १०० किमी/तास वेगाने वाहणारे वारे. हवामान: मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे पुलाच्या कामात मोठे अडथळे आले.

जड वाहनांना बंदी: अतिरिक्त टोल नाही

सुरुवातीच्या सहा महिन्यांसाठी या मार्गावरून केवळ कार आणि बस सारख्या प्रवासी हलक्या वाहनांना प्रवेश दिला जाईल. अवजड ट्रॅकला सध्याच्या जुन्या घाटातूनच जावे लागेल. या नवीन मार्गासाठी प्रवाशांकडून कोणताही अतिरिक्त टोल आकारला जाणार नाही. खालापूर किंवा उर्से टोल नाक्यावर सध्या असलेला टोलच कायम राहील. तसेच खंडाळा घाटातील 'अडोशी' आणि 'अमृतांजन पॉईंट' यांसारखी अपघातप्रवण वळणे टाळता येणार असल्याने अपघातांचे प्रमाण जवळपास शून्यावर येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news