Bihar Election Result Pudhari
राष्ट्रीय

Bihar Election Result: बिहार निवडणुकीत अजित पवारांच्या 14 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता; किती मते पडली?

NCP’s Worst Performance in Bihar: बिहार निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली असून 14 पैकी एकाही उमेदवाराला हजार मतांचा आकडाही पार करता आलेला नाही.

Rahul Shelke

NCP Ajit Pawar Bihar Election Results: बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत असताना एनडीएने ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर मतदारांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करत एनडीएला स्पष्ट बहुमत दिल्याचे चित्र दिसत आहे. मागील दोन दशकांपासून नितीश कुमार यांचा प्रभाव कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

मात्र महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच स्वतंत्रपणे बिहारमध्ये उतरलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब ठरली आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा परत मिळवण्यासाठी बिहारमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता; परंतु मतदारांनी राष्ट्रवादीची दखलच घेतलेली नाही, असे निकालांवरून स्पष्ट होत आहे.

राष्ट्रवादीच्या 14ही उमेदवारांची स्थिती बिकट

हाती आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादीच्या सर्व 14 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकाही उमेदवाराला 1,000 मतांचा टप्पाही पार करता आला नाही. अनेक ठिकाणी उमेदवारांना NOTA पेक्षाही कमी मते मिळाल्याचे दिसत आहे. काही मतदारसंघांत अपक्ष उमेदवारसुद्धा राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पुढे आहेत.

'एकला चलो'चा फटका?

महाराष्ट्रात भाजपसोबत सत्ता चालवत असताना बिहारमध्ये मात्र राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला होता. हीच रणनीती पक्षासाठी घातक ठरल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल हे या संपूर्ण निवडणूक मोहिमेचे प्रभारी होते; मात्र निकालांनी त्यांच्या रणनीतीवरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळालेली मते

(प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांचा आकडा अत्यंत कमी असून बहुतांश ठिकाणी 100–300 मतांच्या आसपास स्थिती)

  • सैफ अली खान (मनिहारी) - 730

  • विपिन कुमार पटेल (परसा) - 254

  • धर्मवीर महातो (सोनेपूर) - 65

  • अखिलेश कुमार ठाकूर (महुआ) - 288

  • अनिल कुमार सिंह (राघोपुर) - 241

  • विकास कुमार (बाखरी) - 234

  • डॉ. राशिद अझीम (नरकटियागंज) - 218

  • जयप्रकाश कुशवाह (नौतन) - 114

  • अमित कुमार कुशवाह (पिंपरा) - 821

  • अनिल सिंह (अमरपूर) - 121

  • आदिल आफताब खान (पाटणा साहीब) - 351

  • डॉ. भारती अनुराधा (मोहनिया) - 109

  • आशुतोष कुमार सिंह (सासाराम) - 110

  • मनोजकुमार सिंह (दिनोरा) - 161

या आकडेवारीवरून स्पष्ट होते की अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बिहारमध्ये अजिबातच प्रतिसाद मिळालेला नाही. बिहारच्या राजकीय समीकरणांत राष्ट्रीय दर्जा परत मिळवण्याचे स्वप्न किती दूर आहे, याची जाणीव या निकालानी करून दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT