

Bihar Elections Results : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट होवू लागले आहेत. राज्यात बहुमतासाठी १२२ जागांची गरज आहे. दुभारतीय जनता पक्ष (भाजप) आणि संयुक्त जनता दल (जेडी(यू)) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ने विरोधी महाआघाडीवर निर्णायक आघाडी घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा रालोआचे सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रालोच्या अभूतपूर्व यशात माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहारमधील बहुचर्चित राजकीय व्यक्तिमत्त्व अशी ओळख असणारे तेज प्रताप यादव हे पिछाडीवर पडले आहेत.
तेज प्रताप यादव हे बिहारमधील महुआ मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात जनशक्ती जनता दल (JJD), एनडीएच्या चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पार्टी (राम विलास), महाआघाडीतील राष्ट्रीय जनता दल आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. महुआमधील कल काय दर्शवतात?महुआमधील ताज्या कलानुसार तेज प्रताप यादव मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत. (LJP(RV)) चे नेते संजय कुमार सिंह ३४,००० हून अधिक मतांनी आघाडीवर आहेत; दुसऱ्या क्रमांकावर आरजेडीचे नेते आणि विद्यमान आमदार मुकेश कुमार रोशन असून त्यांना जवळपास २०,००० मते मिळाली आहेत; तर एआयएमआयएमचे अमित कुमार यांनी ९,५६४ मते मिळवली आहेत. तेज प्रताप यांना ९,५५७ मते मिळाली आहेत आणि ते संजय कुमार सिंह यांच्यापेक्षा २०,००० हून अधिक मतांनी पिछाडीवर आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीला आरजेडीमधून हकालपट्टी झाल्यानंतर तेज प्रताप यांनी स्वतःचा जनशक्ती जनता दल (JJD) हा पक्ष स्थापन केला. या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या पहिल्या यादीत एकूण २१ उमेदवार होते. तेज प्रताप यांनी स्वतः महुआ येथून आपली उमेदवारी जाहीर केली होती. महुआ विधानसभा मतदारसंघाबद्दल महुआ विधानसभा मतदारसंघ बिहारच्या वैशाली जिल्ह्यात येतो. २०१५ मध्ये तेज प्रताप यादव यांनी आरजेडीचे सदस्य म्हणून आमदारपद भूषवले होते.
२०२० मध्ये महुआ कोणी जिंकले? २०२० च्या विधानसभा निवडणुकीत आरजेडीचे मुकेश कुमार रोशन १३,७७० मतांच्या फरकाने विजयी झाले, त्यांनी जेडी(यू)च्या आश्मा परवीन यांचा पराभव केला. रोशन यांना ६२,७४७ मते मिळाली, तर परवीन यांना ४८,९७७ मते मिळाली होती.