'सौम्या मोटर्स' शोरूमचे मालक आणि काँग्रेस नेते प्रवेश अग्रवाल यांच्या घरातील पूजा कक्षातील 'अखंड ज्योत' (सलग तेवणारा दिवा) मुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यानंतर, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक सुरक्षा प्रणालीमुळे सेंट्रल लॉक जाम झाले.
Congress Leader Dies in Fire Indore
इंदौर : मध्य प्रदेशातील इंदौर शहरात आज (दि.२३) सकाळी अग्नितांडवात कार शोरूमचे मालक आणि काँग्रेस नेते प्रवेश अग्रवाल यांच्या मृत्यू झाला. त्यांची पत्नी व दोन मुलींची प्रकृती गंभीर आहे. आग स्वयंपाकघरात लागली आणि बघता बघता ती संपूर्ण घरात पसरल्याचे प्राथमिक वृत्त आहे. हा अपघात इंदौरच्या लसूडिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सौम्या मोटर्सच्या वर असलेल्या पेंट हाऊसमध्ये घडला. प्रवेश अग्रवाल हे माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांचे निकटवर्तीय होते.
प्रवेश अग्रवाल यांच्या घराच्या स्वयंपाकघरात आग लागली, जी हळूहळू पूर्ण घरात पसरली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने सर्वांना रुग्णालयात पोहोचवले. तिथे डॉक्टरांनी प्रवेश अग्रवाल यांना मृत घोषित केले. प्रवेश यांची पत्नी रेखा यांची प्रकृतीही गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची १४ वर्षांची मुलगी सौम्या आणि १२ वर्षांची मायरा याही जखमी झाल्या आहेत.
प्रवेश अग्रवाल यांच्या घरातील पूजा कक्षातील 'अखंड ज्योत' (सलग तेवणारा दिवा) मुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यानंतर, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक सुरक्षा प्रणालीमुळे सेंट्रल लॉक जाम झाले. त्यामुळे त्यांना बाहेर पडण्यास अडचण निर्माण झाली. धुरामुळे गुदमरून प्रवेश यांचा मृत्यू झाला. आग लागल्यानंतर त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाला वाचवले, पण स्वतःचा जीव वाचवू शकले नाहीत.
प्रवेश अग्रवाल यांचे 'सौम्या मोटर्स' नावाचे अनेक शोरूम मध्य प्रदेशमध्ये आहेत. ते माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांचे निकटवर्तीय होते. प्रवेश यांनी 'नर्मदा युवा सेना' नावाची संघटनाही स्थापन केली होती. आगीची दुर्घटना झाली तेव्हा सुरक्षारक्षक (गार्ड) देखील हजर होते, पण मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. प्रवेश अग्रवाल हे ग्वाल्हेरचे रहिवासी होते आणि त्यांचे भाऊ मुकेश अग्रवाल यांच्यासह कुटुंबातील अनेक सदस्य तेथेच राहतात. ते महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही अनेक ऑटोमोबाईल एजन्सी चालवत होते. यासोबतच ते देवास परिसरात राजकीयदृष्ट्या सक्रिय होते.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमल नाथ यांनी सोशल मीडिया 'एक्स'वर पोस्ट करून शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले, "इंदौरमध्ये आग लागल्याच्या दुर्दैवी घटनेत काँग्रेस नेते प्रवेश अग्रवाल यांच्या निधनाची आणि त्यांच्या पत्नीच्या गंभीर प्रकृतीची बातमी ऐकून खूप दुःख झाले. अग्रवाल हे काँग्रेसचे सच्चे शिपाई होते. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. कुटुंबातील इतर सदस्य लवकर बरे व्हावेत, ही कामना. ओम शांती."