

Rajasthan bus fire
जैसलमेर : राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी एका धावत्या एसी बसला भीषण आग लागली. या अपघातात आतापर्यंत २० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक बसमध्येच जिवंत जळाले, तर काहींनी खिडक्या तोडून कसेबसे आपले प्राण वाचवले. आग लागल्यानंतर बसचा दरवाजा लॉक झाला होता, त्यामुळे लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.
दरम्यान, आगीत बळी पडलेल्या २० जणांची ओळख पटविण्यासाठी डीएनए सॅम्पल घेतले जात आहे. त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांचे नमुने घेतले जात आहेत.
धावत्या बसला आगीने वेढले
ही घटना जैसलमेर-जोधपूर महामार्गावर थईयात गावाजवळ दुपारी सुमारे ३:३० वाजता घडली. बसमध्ये एकूण ५७ प्रवासी होते. बस रोजच्याप्रमाणे दुपारी ३ वाजता जैसलमेरहून जोधपूरसाठी निघाली होती. सुमारे २० किलोमीटर धावल्यानंतर अचानक बसच्या मागील भागातून धूर येऊ लागला. चालक किंवा प्रवाशांना काही समजण्यापूर्वीच आगीने संपूर्ण वाहनाला आपल्या विळख्यात घेतले.
अपघातानंतर १९ गंभीररित्या भाजलेल्या प्रवाशांना जोधपूरला हलवण्यात आले, त्यापैकी बहुतेकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जैसलमेरमध्ये चार जखमींवर उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. बस जैसलमेरहून जोधपूरकडे जात असताना अचानक एसी युनिटमध्ये आग लागली आणि काही क्षणातच तिने संपूर्ण वाहनाला आपल्या कवेत घेतले. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवली.
पंतप्रधान मोदींकडून नुकसानभरपाईची घोषणा
बस अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी 'एक्स' वर लिहिले की, "अपघातात झालेल्या जीवित आणि वित्तहानीमुळे मी व्यथित आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना पीडित लोक आणि त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. जे जखमी आहेत ते लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो," असे ते म्हणाले. "पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये नुकसानभरपाई दिली जाईल," असेही त्यांनी सांगितले.