

Brahmaputra Apartments fire
नवी दिल्ली : दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयासमोरील ब्रम्हपुत्रा अपार्टमेंटला शनिवारी (दि.१८) दुपारी भीषण आग लागली. लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांच्या निवासस्थान ब्रम्हपुत्रा अपार्टमेंटमध्ये आहेत. महाराष्ट्रातील राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांचे निवासस्थान देखील अपार्टमेंटमध्ये आहे. या भीषण आगीमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
तथापि, काही रहिवाशांनी दावा केला आहे की, या घटनेत काही लहान मुले जखमी झाली आहेत आणि त्यांना आरएमएल रुग्णालयात नेण्यात आले आहे. इमारतीत पहिले तीन मजले कर्मचाऱ्यांचे असून या इमारतीच्या चौथ्या मजल्यापासूम खासदारांची निवासस्थान आहेत. पहिल्या तीन मजल्यावरील घरे आगीने जळाली आहेत. इमारतीच्या पार्किंग भागात पीडब्लूडी विभागाचे सामान ठेवण्यात आले होते, याच सामानाला आग लागली. या आगीने रौद्र रूप धारण केले.
दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि दुपारी २:१० वाजेपर्यंत आग विझवण्यात आली. दरम्यान, काही रहिवाशांनी असा दावा केला की, मुले फटाके फोडत असताना काही सोफ्यांना आग लागल्याने भीषण आग लागली.