India Air Pollution : देशातील वायू प्रदूषणाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. जगभरातील १०० सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत तब्बल ९१ शहरे एकट्या भारतातील असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिअल-टाइम हवेची गुणवत्ता आणि प्रदूषण पातळीची नोंद ठेवणाऱ्या 'AQI.in' या संकेतस्थळाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी (दि.११) संध्याकाळी ७ वाजता पंजाबमधील फरीदकोट हे जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले. येथे हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ६०५ नोंदवला गेला. या यादीत पाकिस्तानमधील तीन तर चीनमधील सहा शहरांचा समावेश आहे.
हवेचा गुणवत्ता निर्देशांक मोजणार्या खासगी संस्था आणि भारताच्या अधिकृत आकडेवारीत फरक पाहायला मिळतो. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) मंगळवारी संध्याकाळी ४ वाजता प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, हरियाणामधील गुरुग्रामच्या पचगाव येथील हवा सर्वात जास्त खराब नोंदवली गेली, जिथे एक्युआय ३८० होता.
दिवाळीनंतर दिल्ली-एनसीआरच्या हवेत किंचित सुधारणा दिसून आली असली, तरी प्रदूषण अद्याप कायम असून हवा 'खराब' श्रेणीतच आहे. दिवाळीच्या दिवशी आणि त्यानंतर दिल्लीचा एक्युआय ३५० च्या पार गेला होता. मात्र, मंगळवारी राष्ट्रीय राजधानीचा सरासरी एक्युआय ३०० च्या खाली नोंदवला गेला. तसेच ५९ पैकी एकाही देखरेख केंद्रात (Monitoring Station) प्रदूषण पातळी ४०० च्या वर गेली नाही; दिवाळीच्या दिवशी तब्बल २० हून अधिक ठिकाणी एक्युआय ४०० पार गेला होता.
'AQI.in' च्या माहितीनुसार, मंगळवारी जगातील ५० सर्वात प्रदूषित शहरांपैकी ४९ शहरे भारतातील होती. या यादीतील एकमेव परदेशी शहर लाहोर २३ व्या क्रमांकावर होते. भारतातील अव्वल पाच शहरांमध्ये फरीदकोट, बठिंडा, श्रीगंगानगर, सिरसा आणि हिसार येथे एक्युआय ५०० च्या वर गेला होता.दुसरीकडे, CPCB च्या संध्याकाळी ४ वाजताच्या आकडेवारीनुसार, श्रीगंगानगरचा एक्युआय २७८, सिरसाचा ३२२ तर हिसारचा ३१६ नोंदवला गेला.
फरीदकोट ६०५
बठिंडा ५४०
श्रीगंगानगर ५३५
सिरसा ५२६
हिसार ५१४
दिल्ली-एनसीआरमध्ये वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणातील प्रचंड वाढीवर सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या समस्येवर तात्काळ कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणी न्यायालयाने दिल्ली सरकारसह उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान सरकार, दिल्ली महानगरपालिका (MCD) आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे.