Kolhapur Air Pollution | कोल्हापूर शहरातील हवा आरोग्यासाठी बनली डेंजर!

रोज तीन सिगारेट ओढण्याइतके घातक झाले शहरातील हवा प्रदूषण; ‘एक्यूआय’ संस्थेच्या अहवालातून माहिती समोर
Kolhapur Air Pollution |
Kolhapur Air Pollution | कोल्हापूर शहरातील हवा आरोग्यासाठी बनली डेंजर!
Published on: 
Updated on: 

आशिष शिंदे

कोल्हापूर : सिगारेट ओढत नसाल, तरी कोल्हापुरात दररोज तीन सिगारेट इतका धूर शरीरात जात असल्यासारखी प्रदूषणाची स्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुरातील हवेची गुणवत्ता दिवसागणिक ढासळत असून, शहरातील हवेत श्वास घेणे म्हणजे दररोज ३.१ सिगारेट ओढण्याइतकाच घातक परिणाम शरिरावर होत असल्याची धक्कादायक माहिती एक्यूआय संस्थेच्या अहवालातून समोर आली आहे. चिंताजनक बाब म्हणजे एका आठवड्याचा विचार केल्यास २१.७, तर महिन्याला ९३ सिगारेट ओढण्याइतका हवा प्रदूषणाचा घातक परिणाम आरोग्यावर होऊ शकतो.

ताराबाई पार्क परिसरातील रविवारी हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १६२ वर पोहोचला. ही हवा ‘अनहेल्दी’ अर्थात आरोग्यास घातक श्रेणीत आहे. यामुळे जागतिक स्तरावरील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत कोल्हापूरचा १२३ वा क्रमांक असल्याचे संस्थेच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. ही क्रमवारी दररोज बदलत असते. या ठिकाणी पीएम २.५ चे प्रमाण ७१ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर, तर पीएम १० चे प्रमाण ८१ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर नोंदविण्यात आले.

अशी होते प्रदूषणाची सिगारेटच्या धुराशी तुलना!

बर्कले अर्थ संस्थेच्या निकषानुसार, हवेतील प्रदूषणाची तुलना सिगारेटच्या धुराशी केली जाते. त्यानुसार कोल्हापुरातील हवा श्वासावाटे शरीरात जाणे म्हणजे दररोज सुमारे तीन सिगारेट ओढण्याइतके घातक ठरू शकते. हवेतील पीएम २.५ चे प्रमाण २२ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर असल्यास ते दिवसाला एक सिगारेट ओढण्याइतके घातक मानले जाते. पीएम २.५ चे प्रमाण ७१ असल्याने हा आकडा सुमारे ३.२ सिगारेट येतो. म्हणजेच, सिगारेट न ओढताही प्रदूषित हवेमुळे शरीरावर धूम्रपानासारखा दुष्परिणाम होण्याची भीती आहे.

कोल्हापुरात सूक्ष्म धूलिकण ठरतायेत तापदायक

शहरातील हवेत पार्टिक्युलेट मॅटर अर्थात सूक्ष्म धूलिकण हे प्रमुख प्रदूषक असल्याचे आकडेवारीवरून दिसते. पीएम २.५ हे अतिसूक्ष्म कण श्वसनाद्वारे फुफ्फुसांच्या खोल भागापर्यंत पोहोचू शकतात. तर पीएम १० आकाराचे धूलिकण श्वसनसंस्थेवर परिणाम करू शकतात. वाहनांचा धूर, बांधकामांमधून उडणारी धूळ, रस्त्यांवरील धूलिकण आणि औद्योगिक उत्सर्जन ही अशा प्रदूषणाची कारणे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.