

मुंबई: दिवाळी सणात फटाक्यांची प्रचंड आतषबाजी झाल्याने मुंबई शहरावर प्रदूषणाचे ढग दाटले आहेत. हवेची दृष्यमानता कमी झाल्याने रस्ते धूरसदृश वातावरणात हरवून गेले आहेत. त्यामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळेस वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
रविवारच्या तुलनेत सोमवारी मुंबईतील वायुप्रदूषणामध्ये थोडी घट दिसून आली. मात्र, त्याने फारसा फरक पडलेला नाही. हवेतील धुळीचे प्रमाण कमी झालेले नाही.
दिवाळीच्या पहिल्या दिवसाचा जल्लोष पाहता रविवारी रात्री मुंबईचा सरासरी एक्यूआय तीनशेच्या (२७८) घरात गेला. दुसऱ्या दिवशी फटाक्यांची आतषबाजी कमी राहिली, त्या तुलनेत प्रमाण कमी झाल्याने हवा प्रदूषणामध्ये थोडी घट झाली. एक्यूआय सोमवारी १७३ वर आला. मात्र, ही सुद्धा खराब हवेची गुणवत्ता आहे.
सोमवारी दहिसर, पूर्वेमध्ये (१९८) सर्वाधिक प्रदूषण आढळून आले. दहिसरसह कांदिवली, अंधेरी आणि वांद्रे या पश्चिम उपनगरातील प्रमुख ठिकाणांसह विक्रोळी (कन्नमवार नगर), हिंदू कॉलनी, चेंबूर, अणुशक्ती नगर आदी भागांमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक हा १७५ ते २०० दरम्यान नोंदला गेला.
हवेतील वाढते प्रदूषण हे विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाशी संबंधित त्रास असलेल्या व्यक्तींसाठी धोकादायक आहे. सध्याच्या प्रदूषित हवेमुळे डोळ्यांची जळजळ, घशात खवखव, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होण्याच्या आजारांमध्ये मोठी वाढ झाली आहे
मुंबईतील वाहनांची वाढती संख्या, मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकामांमधून निर्माण होणारी धूळ आणि औद्योगिक प्रदूषण तसेच फटाक्यांची आतषबाजी ही हवेची गुणवत्ता खालावण्यामागील प्रमुख कारणे आहेत.