MMRDA JE Exam Irregularities Abhijeet Dipke Pudhari
राष्ट्रीय

Abhijeet Dipke: MMRDA JE भरतीत मोठा घोटाळा? एकाच सेंटरमधून अनेकजण टॉपर, अभिजीत दीपकेने केली चौकशीची मागणी, काय आहे प्रकरण?

MMRDA JE Exam Irregularities: MMRDAच्या JE भरती परीक्षेतील कथित अनियमिततांबाबत CJPचे संस्थापक अभिजीत डिपके यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

MMRDA JE Exam Irregularities: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDAच्या ज्युनियर इंजिनिअर भरती परीक्षेच्या निकालावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप काही उमेदवारांकडून करण्यात येत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या प्रकरणाकडे लक्ष वेधलं आहे. अनेक परीक्षार्थींनी आपल्याशी संपर्क साधून MMRDA JE भरती परीक्षेतील अनियमिततेबाबत माहिती दिल्याचं दिपके यांनी म्हटलं आहे.

दिपके यांच्या म्हणण्यानुसार, इतर स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवू न शकलेले काही उमेदवार MMRDAच्या परीक्षेत थेट टॉपर्स असल्याचा दावा करण्यात येत आहे. याशिवाय, निकालातील अनेक टॉपर्स एकाच परीक्षा केंद्रातील असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात स्वाभाविकपणे प्रश्न निर्माण झाले आहेत.

दरम्यान, MMRDA JE भरती 2026 अंतर्गत विविध अभियांत्रिकी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. माहितीनुसार, या भरतीत 104 जागांचा समावेश होता आणि परीक्षा 11 व 12 मे 2026 रोजी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. निकाल 15 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर झाल्याची माहिती आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी गुणांबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. काही उमेदवारांना 190 पेक्षा जास्त गुण मिळाल्याच्या चर्चा सुरू आहेत. विशेष म्हणजे, यापैकी काही उमेदवार पहिल्यांदाच परीक्षा देत असल्याचे दावेही करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे अभ्यास करतात. अशा परिस्थितीत निकालाच्या प्रक्रियेवर जर शंका निर्माण झाली, तर त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या विश्वासावर होतो.

त्यामुळे MMRDA आणि संबंधित परीक्षा यंत्रणांनी या आरोपांकडे गांभीर्याने पाहणं अपेक्षित आहे. परीक्षा केंद्रनिहाय निकाल, उमेदवारांची मागील परीक्षांमधील कामगिरी, गुणांमध्ये झालेली वाढ आणि परीक्षा प्रक्रियेशी संबंधित इतर बाबी तपासल्या गेल्या, तर या आरोपांमागील सत्य समोर येऊ शकतं.

विशेष म्हणजे, MMRDA JE परीक्षा ऑनलाइन CBT पद्धतीने घेण्यात आली होती. त्यामुळे परीक्षा यंत्रणेकडे उमेदवारांच्या परीक्षेचा डिजिटल डेटा उपलब्ध असण्याची शक्यता आहे. डेटाच्या आधारे परीक्षा प्रक्रियेत काही अनियमितता झाली का, याची तपासणी करता येऊ शकते.

आता या आरोपांवर MMRDA आणि संबंधित प्रशासन काय भूमिका घेतं, तसेच या प्रकरणाची अधिकृत चौकशी केली जाते का, याकडे परीक्षार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT