

Karnataka High Court Homemaker Definition: गृहिणी म्हणजे फक्त दिवसभर घरी राहणारी आणि घरकाम करणारी महिला, असा आपला समज असतो. मात्र, कर्नाटक उच्च न्यायालयाने ‘होममेकर’ म्हणजेच घर सांभाळणाऱ्या व्यक्तीची व्याख्या सांगितली आहे. न्यायालयाने म्हटले की, कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणारी, त्यांच्या हितासाठी घरात सेवा देणारी कोणतीही व्यक्ती ‘होममेकर’ मानली जाऊ शकते.
विशेष म्हणजे, होममेकर ही संज्ञा केवळ महिलांसाठी नाही, तर पुरुषांसाठीही लागू होऊ शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले. म्हणजेच घर आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारा पुरुष असो किंवा महिला, दोघांनाही होममेकर मानले जाऊ शकते.
न्यायमूर्ती चिल्लाकूर सुमलता यांच्या खंडपीठाने म्हटले की, एखादी महिला उच्चशिक्षित आहे म्हणून तिला होममेकर म्हणता येणार नाही, असे नाही. तसेच महिला नोकरी करत असेल किंवा एखाद्या व्यवसायात कार्यरत असेल, तरीही ती घरातील सदस्यांची काळजी घेत असेल आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असेल तर तिलाही होममेकर मानले जाऊ शकते.
न्यायालयाने हेही स्पष्ट केले की, एखाद्या महिलेला होममेकर सिद्ध करण्यासाठी ती अशिक्षित असणे किंवा 24 तास घरातच राहणे आवश्यक नाही. तिने फक्त घरकामच केले पाहिजे, अशी कोणतीही अट नाही. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, नोकरी करणारी महिला घर आणि कुटुंबाची जबाबदारीही सांभाळत असेल, तर तीही होममेकर आहे.
कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच KSRTC आणि एका महिलेच्या अपघाताच्या नुकसानभरपाईच्या प्रकरणात हा निर्णय देण्यात आला.
या महिलेचा ऑक्टोबर 2013 मध्ये रस्ते अपघात झाला होता. त्यावेळी तिचे वय 25 वर्षे होते. तिने बायोटेक्नॉलॉजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. यापूर्वी तिने एका महाविद्यालयात गेस्ट लेक्चरर म्हणून काम केले होते आणि तिला दरमहा 35 हजार रुपये पगार मिळत होता.
मात्र, अपघाताच्या वेळी ती त्या नोकरीत कार्यरत नव्हती. अपघातामुळे तिला कायमस्वरूपी शारीरिक अपंगत्व आले. त्यानंतर तिला नुकसानभरपाई मिळावी, अशी तिची मागणी होती.
KSRTCने असा युक्तिवाद केला की, महिला उच्चशिक्षित आहे आणि अपघाताच्या वेळी नोकरी करत नव्हती. त्यामुळे तिला होममेकर मानता येणार नाही आणि तिला नुकसानभरपाई देऊ नये. यापूर्वी मोटार अपघात न्यायाधिकरणानेही नुकसानभरपाई देण्यास नकार दिला होता.
मात्र, महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली. तिने सांगितले की, अपघातामुळे आलेल्या कायमस्वरूपी अपंगत्वामुळे तिच्या काम करण्याच्या आणि उत्पन्न मिळवण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. ती नोकरी करत नसली तरी घरातील जबाबदाऱ्या सांभाळणारी होममेकर म्हणून तिच्या सेवांचेही आर्थिक मूल्य आहे.
उच्च न्यायालयाने महिलेचा मुद्दा मान्य करत होममेकरची व्यापक व्याख्या केली. न्यायालयाच्या मते, कुटुंबासाठी सातत्याने काम करणारी, सदस्यांची काळजी घेणारी, त्यांच्या हिताचा विचार करणारी आणि कुटुंबाचा आधार बनणारी व्यक्ती होममेकर असू शकते.
त्यामुळे एखादी व्यक्ती नोकरी करणारी, कमावणारी किंवा कुटुंबाची आर्थिक जबाबदारी उचलणारी असली तरीही ती घरातील जबाबदाऱ्या सांभाळत असेल, तर तिला होममेकर मानता येईल.
या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता. महिलेच्या वैद्यकीय खर्चाची रक्कम तिच्या मेडिक्लेम विमा कंपनीने आधीच दिली होती. त्यामुळे KSRTCने असा दावा केला की, तोच वैद्यकीय खर्च पुन्हा अपघात नुकसानभरपाईत देणे म्हणजे महिलेला दुहेरी फायदा होईल. मात्र, कर्नाटक हायकोर्टाने हा युक्तिवाद फेटाळला.
न्यायालयाने स्पष्ट केले की, मेडिक्लेममधून मिळणारी रक्कम आणि मोटार अपघात कायद्याअंतर्गत मिळणारी नुकसानभरपाई या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मेडिक्लेमची रक्कम संबंधित व्यक्तीने भरलेल्या विमा प्रीमियमच्या आधारे मिळते. तर अपघाताची नुकसानभरपाई हा कायद्याने मिळणारा अधिकार आहे.
म्हणून विमा कंपनीकडून वैद्यकीय खर्चाची रक्कम मिळाली म्हणून अपघातातील कायदेशीर नुकसानभरपाई कमी करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले.
न्यायालयाने या प्रकरणात महिलेचे मासिक उत्पन्न 8 हजार रुपये निश्चित केले. अपघाताच्या वेळी तिचे वय 25 वर्षे असल्याने 18 हा गुणक वापरण्यात आला. तिला 10 टक्के कायमस्वरूपी शारीरिक अपंगत्व असल्याचेही विचारात घेण्यात आले.
यामुळे 1 लाख 72 हजार 800 रुपये नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. तसेच उपचार आणि बरे होण्याच्या काळात होममेकर म्हणून तिच्या सेवांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन आणखी 24 हजार रुपये देण्यात आले.
अशा प्रकारे एकूण नुकसानभरपाईत 1 लाख 96 हजार 800 रुपयांची वाढ करण्यात आली. या रकमेवर वार्षिक 6 टक्के व्याजही देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. KSRTCचे अपील फेटाळून ही रक्कम आठ आठवड्यांच्या आत जमा करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.
हा निर्णय विशेष महत्त्वाचा मानला जात आहे, कारण न्यायालयाने घर सांभाळण्याच्या कामाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. होममेकर होण्यासाठी अशिक्षित असणे, बेरोजगार असणे किंवा दिवसभर घरात राहणे आवश्यक नाही, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
घरातील सदस्यांची काळजी घेणे, कुटुंबाच्या सुखासाठी योगदान देणे आणि घरातील जबाबदाऱ्या सांभाळणे ही कामेही महत्त्वाची आहेत. त्यामुळे एखादी व्यक्ती नोकरी करत असली तरी घराची जबाबदारी सांभाळत असेल, तर तिच्या त्या भूमिकेलाही होममेकर म्हणून मान्यता मिळू शकते. हा निर्णय रस्ते अपघातातील नुकसानभरपाईच्या दाव्यांमध्येही महत्त्वाचा ठरू शकतो.