TET Exam Scam: शिक्षकांची पात्रता तपासणारी यंत्रणाच अपात्र

टीईटी परीक्षा रद्दमुळे तीव्र संताप : कायद्यात बदल करा; वेठीस न धरता परीक्षेतून सूट देण्याची मागणी
TET Exam Scam
TET Exam Scam
Published on
Updated on

सांगली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत रविवार, दि. २८ जूनरोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण १०२८ केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु प्रश्नपत्रिका फुटल्याने ही परीक्षा रद्द करून ती पुढे ढकलण्यात आल्याचे परिषदेने जाहीर केले आणि सांगली जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली. सेवेत असणाऱ्या शिक्षकांची पात्रता तपासणारी यंत्रणाच आता अपात्र ठरली आहे, असा संताप व्यक्त होत आहे.

परिषदेच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या निवेदनानुसार, रविवारी २८ रोजी ही परीक्षा होणार होती, परंतु आज शनिवारी २७ जूनरोजी पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलिस यांनी सदर ठिकाणी धाड घातली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता, सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. या परीक्षेबाबत अ‌द्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. या प्रकारामुळे परीक्षा देणाऱ्या शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतो आहे.

१६, ३५० उमेदवारांना मनस्ताप

राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात (टीईटी) रविवार, दि. २८ जूनरोजी घेतली होती. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील १६,३५० उमेदवारांनी नोंदणी केली होती. यामध्ये सर्वसामान्य उमेदवार व सेवेत असलेल्या शिक्षकांचा समावेश आहे. टीईटी जिल्ह्यातील ३४ केंद्रांवर आणि दोन सत्रात होणार होती. या परीक्षेसाठी पेपर क्रमांक एकसाठी ६,७६२ आणि पेपर क्रमांक दोनसाठी ९,५८८ अशा एकूण १६,३५० उमेदवारांनी नोंदणी केली आहे, पण आता ही परीक्षाच रद्द झाली.

सेवेत असणाऱ्या शिक्षकांना परत एकदा टीईटी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे . हा निर्णय कायद्याने अनिवार्य केल्यामुळे शिक्षक संभ्रमात आहेत. त्यात असे पेपर फुटी प्रकरण हे निश्चितच सर्व समाजाला घातक आहे. सरकारने याबाबतीत योग्य पाऊल उचलून शिक्षकांना वेठीस धरू नये. पेपर फुटी प्रकरणे हे महाराष्ट्राला भूषणावह नाही. ज्या कायद्याने शिक्षकांना टीईटी अनिवार्य केली त्या कायद्यातील तरतुदी सरकारला बदलणे सहज शक्य आहे, त्याबद्दल विचार व्हावा.
- सयाजीराव पाटील, राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news