नवी दिल्ली: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे संपूर्ण आखाती प्रदेश युद्धाच्या छायेत आहे. याचा थेट फटका विमान वाहतुकीला बसला असून, भारतासाठीचे विमानभाडे गगनाला भिडले आहे. सोमवारी (दि. २ मार्च) लंडन ते मुंबई या युरोपियन एअरलाइन्सच्या थेट विमानाचे इकॉनॉमी क्लासचे भाडे तब्बल २.९ लाख रुपयांवर पोहोचले, तर बिझनेस क्लाससाठी प्रवाशांना ९ लाख रुपये मोजावे लागत आहेत.
सामान्यतः या मार्गावर इकॉनॉमी क्लासचे भाडे २०,००० ते ४०,००० रुपये, तर बिझनेस क्लासचे भाडे १.२ लाख ते २.५ लाख रुपयांच्या दरम्यान असते. एअर इंडिया आणि इंडिगोनेही भाडेवाढ करत काही मोजकी उड्डाणे सुरू ठेवली आहेत.
विमान कंपन्यांच्या मते, आखाती क्षेत्रातील हवाई हद्द टाळून दूरच्या मार्गाने विमान न्यावे लागत आहे. यामुळे प्रवास खर्चात वाढ झाली आहे. तसेच मुख्य कारण म्हणजे मागणी आणि पुरवठा यातील तफावत आहे. युद्धामुळे दररोज ७०० हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागत असल्याने उपलब्ध विमानांची तिकिटे महागली आहेत.
दरम्यान, यूएईमध्ये २०,००० हून अधिक भारतीय अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी 'एतिहाद'ने विशेष उड्डाणे सुरू केली असून, 'एमिरेट्स'ही आजपासून या मोहिमेत सहभागी होणार आहे. सोमवार आणि मंगळवारची नियमित वेळापत्रकातील उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
कोलकाता विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, आखाती देशांतील विमान कंपन्यांनी दोन दिवसांत २० उड्डाणे रद्द केली आहेत. ट्रॅव्हल एजंट्सनी आखाती देश, युरोप किंवा अमेरिकेला जाणाऱ्या प्रवाशांना सध्याचा प्रवास लांबणीवर टाकावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हैदराबाद ते लंडन: ६५,००० ते ९०,००० रुपये (नेहमीच्या तुलनेत दुप्पट).
जर्मनी: तिकीट दरात २००% ते ३००% वाढ.
हैदराबाद ते न्यूयॉर्क (इथिओपियामार्गे): १.५ लाख रुपये.
हैदराबाद आणि यूएई दरम्यानची हवाई सेवा पूर्णपणे विस्कळीत. या मार्गावर दररोज सरासरी ५,००० प्रवासी प्रवास करतात, परंतु सोमवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली.