सौरभ राजपूत, सौरभची पत्‍नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला  File Photo
राष्ट्रीय

Blue Drum Murder Case : देशाला हादरवणाऱ्या 'ब्लू ड्रम मर्डर' प्रकरणी आरोपी मुस्कान आणि साहिलला फाशीची शिक्षा

देशभरात गाजलेल्‍या उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील सौरभ राजपूत हत्या प्रकरणी जिल्‍हा न्‍यायालयाचा मोठा निकाल

पुढारी वृत्तसेवा

Meerut Blue Drum Murder Case : देशभरात गाजलेल्‍या उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने आज (१४ ऑक्‍टाबर ) सौरभची पत्‍नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

एक ऐतिहासिक निकाल : वकील कृष्ण कुमार दुबे

वकील कृष्ण कुमार दुबे म्हणाले की, मेरठ येथील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात आरोपी मुस्कान आणि साहिल या दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांना कलम ३०२ अन्वये ५०,००० रुपये आणि कलम २३८-ए अन्वये २०,००० रुपये दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा एक ऐतिहासिक निकाल आहे. संपूर्ण देशाचे याकडे लक्ष होते; या गुन्ह्यातील दोषींना काय शिक्षा मिळते, याकडे जनतेचे डोळे लागले होते.

'आरोपींचे सर्व युक्तिवाद न्यायालयाने फेटाळले'

वकील कृष्ण कुमार दुबे म्हणाले की, आरोपींच्या बाजूने काही युक्तिवाद केले गेले होते. यामध्ये खुनाचा प्रत्यक्षदर्शी कोणीही नव्हता. दोन्ही आरोपींना मुली आहेत, यांचा समावेश होता. मात्र न्यायालयाने हे सर्व युक्तिवाद फेटाळून लावले. कारण सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे इतके भक्कम, महत्त्वपूर्ण आणि अचूक होते की त्यातून त्यांचा गुन्हा निर्विवादपणे सिद्ध झाला.

'एखाद्या महिलेला फाशीची शिक्षा हीच एक पायंडा पाडणारी घटना'

या निकालाचा मुख्य आधार म्हणजे खुनाचे स्वरूप ठरते. कारण मुस्कानने आपल्या पतीशी प्रेमापोटी विवाह केला होता. त्याचीच तिने हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिने पतीच्या शरीराचे तीन तुकडे केले; तसेच त्याचे अवशेष एका निळ्या ड्रममध्ये लपवून ठेवले. हे अत्यंत बारकाईने आखलेले कारस्थान आणि नियोजन होते. तिने अत्यंत शांत आणि संयमित मनाने ही हत्या घडवून आणली. परिणामी, अशा पूर्वियोजित हत्येसाठी फाशीची शिक्षा हीच योग्य शिक्षा होती. देशातील न्यायालयीन निकालांमध्ये हा एक महत्त्वपूर्ण निकाल आहे; एखाद्या महिलेला फाशीची शिक्षा होणे हीच मुळात एक पायंडा पाडणारी घटना आहे, असेही वकील कृष्ण कुमार दुबे यांनी स्पष्ट केले.

अपेक्षित असलेला न्‍याय मिळाला : सौरभ राजपूतच्‍या आई रेणू देवी

या निकालानंतर माध्‍यमांशी बोलताना सौरभ राजपूत यांची आई रेणू देवी म्‍हणाल्‍या की, "आम्हाला खूप छान वाटत आहे. दोन्‍ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे आम्हाला खूप समाधान मिळाले आहे. आम्हाला अपेक्षित असलेला न्याय मिळाला आहे. आम्ही आमचे वकील, सहकारी आणि कर्मचारी यांचे अत्यंत आभारी आहोत; आम्ही सदैव त्यांचे आभार मानू आणि त्यांचे ऋणी राहू. तुरुंगात असलेल्या मुस्‍कानच्‍या मुलीशी आमचा काहीही संबंध नाही. सौरभवच्‍या मोठ्या मुलीला तिच्‍या आजी-आजोबांनी कोणत्याही अटीशिवाय आमच्या स्वाधीन केले, तिची जबाबदारी आम्‍ही घेतली आहे.

काय घडलं होतं?

१८ मार्च २०२५ रोजी, इंदिरानगर येथील रहिवासी असलेल्या बबलूने ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याने सांगितले की, त्याचा भाऊ सौरभ याने २०१६ मध्ये मुस्कान रस्तोगी हिच्याशी प्रेमविवाह केला होता. मुस्कानचे २०१९ पासून साहिल शुक्ला याच्याशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला. बबलूच्या म्हणण्यानुसार, पत्नी आणि साहिल यांच्याकडून मिळणाऱ्या धमक्यांमुळे सौरभला आपल्या जीविताची भीती वाटत होती. सौरभ ५ मार्च २०२५ पासून बेपत्ता होता. तो राहत असलेले भाड्याचे घर (जे ओमपाल यांच्या मालकीचे होते) कुलूपबंद अवस्थेत आढळले आणि मुस्कानही तिथे नव्हती. मुस्कान आणि साहिल यांनीच सौरभची हत्या केली असावी, असा संशय व्यक्त करत बबलूने त्याचा शोध घेण्याची मागणी केली होती.

निळ्या रंगाच्या ड्रममधून मृतदेहाचे अवशेष हस्तगत

१८ मार्च २०२५ रोजी या प्रकरणाचा तपास करताना, मुस्कान आणि साहिल यांनी ३ मार्चच्या रात्री सौरभची हत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला. पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेनंतर हे दोघे ५ मार्च रोजी शिमला-मनालीला गेले होते आणि १७ मार्चला मेरठला परतले. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली. पोलिसांनी एका निळ्या रंगाच्या ड्रममधून सौरभच्या मृतदेहाचे अवशेष हस्तगत केले होते.

१३ महिने चालला खटला

सौरभ राजपूत हत्या प्रकरणातील खटला सुमारे १३ महिने चालला. सुरक्षेच्या कारणास्तव, मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाले. त्यांना जिल्हा कारागृहातून प्रत्यक्ष न्यायालयात आणण्याऐवजी, त्यांनी न्यायालयीन कामकाजात ऑनलाइन सहभाग घेतला.

२२ साक्षीदारांचे जबाब, सुमारे १२५ सुनावण्या

सौरभ हत्या प्रकरणात फिर्यादी पक्षाच्या २२ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवादही पूर्ण झाले होते. जिल्हा सरकारी वकील कृष्ण कुमार चौबे यांच्या मते, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हा न्यायाधीशांनी दररोज सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात सुमारे १२५ सुनावण्या झाल्या होत्‍या.

सौरभ राजपूतच्‍या कुटुंबीयांना मिळाला न्‍याय

निकाल लागण्यापूर्वी, सौरभच्या कुटुंबीयांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. सौरभचा मोठा भाऊ राहुल याने सांगितले होते की, कुटुंबाला आरोपींसाठी केवळ फाशीचीच शिक्षा व्हावी. या प्रकरणामुळे कुटुंब प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचेही त्याने नमूद केले. सौरभची आई रेणू देवी यांनीही न्यायव्यवस्था आणि प्रशासनाकडून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली होती आणि दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, असे म्हटले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT