Madhya Pradesh Politics : मध्य प्रदेश भाजपमधील अंतर्गत सत्तासंघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी आपला मतदारसंघ इंदूरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असा थेट आरोप करत मुख्यमंत्री मोहन यादव यांना एक खरमरीत पत्र लिहिल्याचे वृत्त आहे. विजयवर्गीय यांचे मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचे प्रदीर्घकाळापासूनचे स्वप्न आहे. डिसेंबर २०२३ मध्ये भाजपचे सरकार स्थापन होण्यापूर्वीच त्यांनी ही इच्छा बोलूनही दाखवली होती. त्यामुळेच इंदूरच्या विकासाबाबतचे पत्र हे मध्य प्रदेश भाजपमधील अंतर्गत सत्तासंघर्षाची आणि मुख्यमंत्रिपदासाठीच्या सुप्त लढाईची नांदी मानली जात आहे.
नगरविकास, गृहनिर्माण आणि संसदीय कामकाज मंत्री असणाऱ्या कैलाश विजयवर्गीय यांनी पत्रात नमूद केले आहे की, "मुख्यमंत्री आणि इंदूरचे प्रभारी मंत्री म्हणून मला तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा होती; मात्र गेल्या अडीच वर्षांत मला केवळ असहकार्य, दुर्लक्ष आणि विरोधाचा सामना करावा लागला आहे. इंदूरचा विकास वेगवान करण्याऐवजी, शहराला त्याचे हक्कही मिळत नाहीत. आपल्या विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या त्यांच्या नकळत केल्या जात आहेत. तसेच इंदूरच्या विकासाशी संबंधित प्रश्न त्वरित सोडवले नाहीत, तर आपण हा मुद्दा जनतेसमोर मांडू", असा इशाराही पत्रात दिल्याचे वृत्त आहे.
रिपोर्टनुसार, इंदूरकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करताना विजयवर्गीय यांनी पाच प्रमुख मुद्दे मांडले. यामध्ये इंदूरचा पुढील 'मास्टर प्लॅन' जाहीर करण्यास होणारा विलंब आणि २०२८ मध्ये उज्जैन येथे होणाऱ्या 'सिंहस्थ महाकुंभ' मेळ्याशी संबंधित प्रकल्पांमधून इंदूरला वगळणे यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे.
पत्रामध्ये विजयवर्गीय यांनी इंदूरच्या आसपासच्या परिसराचा 'महानगर क्षेत्र' (मेट्रोपॉलिटन एरिया) म्हणून विकास करण्याच्या योजनांमध्ये उज्जैनचा समावेश करण्यावर आणि त्याला 'इंदूर-उज्जैन महानगर क्षेत्र' असे नाव देण्याच्या प्रस्तावावरही विजयवर्गीय यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, माध्यमांशी बोलताना या पत्राबद्दल विचारले असता ते म्हणाले, "हे पत्र तुम्हाला कोठून मिळाले हे मला माहीत नाही. ते कुठून आले आणि खरे आहे की खोटे, हे तुम्ही संबंधित वर्तमानपत्राच्या लोकांनाच विचारले पाहिजे."
काँग्रेसने या पत्राचा संबंध सरकारमधील अंतर्गत गटबाजीशी जोडला आहे. यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनात काँग्रेसने म्हटले आहे की, "गुरु 'गूळ'च राहिले, पण शिष्य मात्र 'साखर' बनले! इंदूरमधील विकासाकडे होणाऱ्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधण्यासाठी अखेर मंत्री कैलाश विजयवर्गीय यांना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावे लागले! सत्ता आणि वर्चस्वाच्या या लढाईत जनतेलाच फटका बसत आहे. या सत्तासंघर्षाचा भार अखेरीस जनतेने का सोसावा", असा सवालही काँग्रेसने उपस्थित केला आहे.
मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितू पटवारी यांनी विजयवर्गीय यांच्या पत्राला भाजप सरकारचे अपयश आणि अंतर्गत मतभेदांचे लक्षण असल्याचे म्हटले. तसेच, मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन या पत्रातील प्रत्येक मुद्द्यावर उत्तर दिले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, विधानसभेतील विरोधी पक्षनेते उमंग सिंगार आणि काँग्रेसच्या इतर अनेक नेत्यांनी विजयवर्गीय यांच्या पत्रावरून भाजपमधील गटबाजीचा आरोप केला आहे. भाजप नेत्यांमधील या अंतर्गत कलहाचा फटका राज्यातील जनतेला बसत असल्याचे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.
डिसेंबर २०२३ मध्ये भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर, कैलाश विजयवर्गीय हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. विजयवर्गीय आणि इंदूरमधील भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्या भाषणांमधून वारंवार असा आरोप केला आहे की, शहरातील सरकारी अधिकारी त्यांचे म्हणणे ऐकत नाहीत. २०२५ मध्ये, वारंवार मंत्रिमंडळाच्या बैठकांना गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांमध्ये कैलाश विजयवर्गीय यांचाही समावेश होता. त्यामुळेच त्यांचे इंदूरच्या विकासाबाबतचे पत्र हे मध्य प्रदेश भाजपमधील अंतर्गत सत्तासंघर्षाची आणि मुख्यमंत्रिपदासाठीच्या सुप्त लढाईची नांदी मानली जात आहे.