Amit Shah : 'घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, 321 जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार'

पश्चिम बंगाल येथे विजयी झालेल्या आमदारांच्या गटनेता निवडीच्या बैठकीला अमित शहा यांनी संबोधित केले.
Amit Shah
Amit Shah(Pudhari File Photo)
Published on
Updated on

कोलकाता : त्रिपुरा, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार आले आहे. आता सीमा सुरक्षा आणखी मजबूत केली जाईल. तस्करी आणि घुसखोरीवर कठोर कारवाई केली जाईल. घुसखोरांना हाकलून देशाला घुसखोरमुक्त करण्याचे भाजपचे वचन आहे, असा निर्धार भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगाल येथे विजयी झालेल्या आमदारांच्या गटनेता निवडीच्या बैठकीला अमित शहा यांनी संबोधित केले. या बैठकीत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

नवनिर्वाचित आमदारांना संबोधित करताना अमित शहा यांनी भाजपच्या 321 हुतात्म्यांचे स्मरण केले. हा प्रवास सोपा नव्हता. या विजयासाठी 321 भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. संपूर्ण देशातील राजकारण पाहिले आहे. पण पश्चिम बंगाल आणि केरळ येथे झालेला हिंसाचार कधीही पाहिला नाही. कार्यकर्त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे नमूद करत अमित शहा यांनी सर्वांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच बलिदान दिलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना नमन केले.

संघर्षातून मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास

सुवेंदू अधिकारी यांनी 1995 मध्ये काँग्रेसमधून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. 2007 च्या नंदीग्राम आंदोलनात त्यांनी बजावलेली भूमिका बंगालच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली. डिसेंबर 2020 मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. 2021 पासून ते विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत होते. त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे माजी केंद्रीय मंत्री आहेत, तर त्यांचे दोन्ही भाऊदेखील राजकारणात सक्रिय आहेत.

ममता बॅनर्जींचा पराभव अन्‌‍ राजकीय उंची

55 वर्षीय सुवेंदू अधिकारी यांनी या निवडणुकीत नंदीग्राम आणि भवानीपूर अशा दोन्ही जागांवर विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे भवानीपूर मतदारसंघात त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव करत आपली राजकीय ताकद सिद्ध केली. पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील करकुली गावात जन्मलेल्या अधिकारी यांनी आपल्या तीन दशकांच्या राजकीय प्रवासात पंचायत ते संसदेपर्यंत सर्व पदे भूषवली आहेत. अविवाहित असलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी संपूर्ण जीवन समाजकारण व राजकारणाला समर्पित केले आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यांच्या निवडीमुळे बंगालमध्ये भाजपच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली असून संपूर्ण देशाचे लक्ष या शपथविधी सोहळ्याकडे लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news