LPG Booking New Rule: पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारने काही महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. या नव्या नियमांचा थेट परिणाम घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांवर होणार असून, प्रत्येक ग्राहकाला या बदलांची माहिती असणं आवश्यक आहे.
Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) ने जाहीर केलेल्या नव्या नियमानुसार, आता एका ग्राहकाला महिन्यात जास्तीत जास्त दोनच एलपीजी सिलेंडर बुक करता येणार आहेत. यापेक्षा जास्त सिलेंडर बुक करण्याचा प्रयत्न केल्यास सिस्टमकडून बुकिंग ब्लॉक केली जाऊ शकते किंवा अतिरिक्त तपासणी (verification) केली जाऊ शकते.
सरकारकडून आर्थिक वर्षात (१ एप्रिल ते ३१ मार्च) १२ अनुदानित सिलेंडर दिले जातात. याशिवाय गरज असल्यास ग्राहक आणखी ३ नॉन-सब्सिडी सिलेंडर खरेदी करू शकतो. म्हणजेच एका कनेक्शनवर वर्षाला जास्तीत जास्त १५ सिलेंडर बुक करता येणार आहेत.
यासोबतच बुकिंगच्या कालावधीतही बदल करण्यात आला आहे. आधी दुसरा सिलेंडर २१ दिवसांनी बुक करता येत होता, मात्र आता ही मर्यादा वाढवून २५ दिवस करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना पुढील सिलेंडर बुक करण्यासाठी थोडा अधिक वेळ वाट पाहावी लागणार आहे.
जर एखाद्या ग्राहकाने आपला वार्षिक कोटा पूर्ण केला असेल आणि तरीही अतिरिक्त सिलेंडरची गरज भासत असेल, तर त्यासाठी नवीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ग्राहकाला ‘Hello BPCL’ अॅपच्या माध्यमातून काही माहिती द्यावी लागेल. उदाहरणार्थ, घरात लग्न किंवा मोठा कार्यक्रम आहे का, पाहुण्यांची संख्या किती आहे इत्यादी. या माहितीनुसार ग्राहकाला अतिरिक्त सिलेंडर देण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
याशिवाय डिलिव्हरी प्रक्रियेतही कडक नियम लागू करण्यात आले आहेत. सिलेंडर डिलिव्हरीच्या वेळी ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP (DAC) येईल. हा कोड डिलिव्हरी बॉयला दिल्यानंतरच सिलेंडर मिळेल. तसेच बुकिंगसाठी नोंदणीकृत मोबाईल नंबर असणं अनिवार्य करण्यात आलं आहे.
सरकारने e-KYC देखील बंधनकारक केली आहे. ज्या ग्राहकांनी KYC पूर्ण केलेली नाही, त्यांची सबसिडी थांबवली जाऊ शकते किंवा बुकिंगमध्ये अडचणी येऊ शकतात.
एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि गैरवापर टाळण्यासाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत. ग्राहकांनी या बदलांची योग्य माहिती ठेवून वेळेत प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे, अन्यथा गॅस बुकिंग आणि डिलिव्हरीमध्ये अडथळे येऊ शकतात.