केंद्रीय मंत्री किरण रिजिजू. Pudhari Photo
राष्ट्रीय

Kiren Rijiju :"काँग्रेसने माफी मागावी...": 'त्‍या' पोस्‍टबाबत लष्कराच्‍या स्‍पष्‍टोक्‍तीनंतर केंद्रीय मंत्री रिजिजूंची मागणी

चिनी वाहनांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्‍याचा काँग्रेस नेत्‍या रितू चौधरींनी केला होता दावा

पुढारी वृत्तसेवा

Kiren Rijiju Congress apology fake China video : काँग्रेस नेत्‍या रितू चौधरी यांनी शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये चिनी वाहने भारतीय हद्दीत शिरल्याचा दावा केला होता, तर दुसऱ्या पोस्टमध्ये अरुणाचल प्रदेशातील काही भागांवर चीनने ताबा मिळवल्याचा आरोप केला होता. मात्र हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट (डीपफेक) असल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट केले. आता या प्रकरणी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला असून, देशाची आणि लष्कराची दिशाभूल केल्याबद्दल काँग्रेसने राष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

रितू चौधरींनी दोन व्‍हिडिओ केले शेअर

काँग्रेसच्या बिहारमधील वक्त्या रितू चौधरी यांनी सोशल मीडियावर दोन व्हिडिओ शेअर केले होते. एका व्हिडिओमध्ये चिनी वाहने भारतीय हद्दीत घुसल्याचा दावा करण्यात आला होता, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये लष्कराच्या अधिकाऱ्याचा हवाला देत चीनने अरुणाचलमध्ये ताबा मिळवल्याचे म्हटले होते.

व्‍हिडिओमुळे खळबळ

रितू चौधरी यांनी सोशल मीडियावर व्‍हायरल केलेला पहिला व्हिडिओ सिक्कीममधील नथु ला पासचा आहे. हा भाग भारत-चीनमधील अधिकृत सीमावर्ती व्यापारासाठी घोषित केलेला मार्ग आहे. तेथे व्यापारी वाहनांची झालेली हालचाल चिनी सैन्याची घुसखोरी म्हणून चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली. दुसरा व्हिडिओ (डीपफेक): यात स्पीअर कॉर्प्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग (GOC) लेफ्टनंट जनरल गिरीश कालिया अरुणाचलबाबत बोलताना दिसत आहेत.

भारतीय लष्कर काय म्‍हणाले?

लष्कराने स्पष्ट केले की, हा व्हिडिओ एआयच्या साह्याने तयार केलेला 'डीपफेक' आहे. मूळ व्हिडिओ २७ ऑक्टोबर २०२३ रोजी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे झालेल्या पत्रकार परिषदेतील आहे. तो नियंत्रण रेषेवरील (LoC) घुसखोरीबाबत होता. त्यांनी अरुणाचल प्रदेश किंवा सैन्याच्या रसद पुरवठ्याबाबत असे कोणतेही विधान केलेले नाही.

किरण रिजिजू यांचा जोरदार हल्लाबोल

अरुणाचल प्रदेशचे खासदार असलेले केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला. "भारतीय लष्कराची प्रतिमा मलीन करण्यासाठी काँग्रेसने एआयचा वापर करून बनावट व्हिडिओ पसरवला आहे. काँग्रेसने यासाठी देशाची माफी मागितली पाहिजे. हे कृत्य देशद्रोहासारखे असून शत्रूंच्या कारस्थानांना खतपाणी घालणारे आहे. काँग्रेस पक्ष भारताच्या शत्रूंच्या बाजूने हा घृणास्पद प्रचार करत आहे," असा घणाघाती आरोप रिजिजू यांनी केला.

काँग्रेस नेत्याने केले होते दाव्‍याचे समर्थन!

लष्कराने सत्य समोर आणल्यानंतरही एनएसयूआय (NSUI) चे अध्यक्ष विनोद जाखड यांनी आपल्या पक्षाच्या दाव्याचे समर्थन केले. "व्हिडिओ बनावट किंवा एडिट केलेला असला, तरी त्यात जे सांगितले आहे ते चुकीचे नाही. ते पूर्णपणे खरे आहे. भाजप सरकार दिल्लीत तरुणांचे आंदोलन रोखण्यासाठी सुरक्षा दल तैनात करत आहे, मग चीन जिथे आपली जमीन हडपत आहे त्या अरुणाचलमध्ये हे सैन्य का तैनात केले जात नाही?" असा सवाल त्यांनी केला.

लष्करविरोधी मानसिकता : भाजपकडून काँग्रेसवर टीकास्त्र

या मुद्द्यावरून भाजपने काँग्रेसवर लष्करविरोधी मानसिकता असल्याचा आरोप केला आहे. भाजपचे प्रवक्ते सी. आर. केसवन यांनी 'एक्स'वर (ट्विटर) पोस्ट करत म्हटले की, "आपल्या सैन्याची प्रतिमा मलीन करण्यासाठी डीपफेक व्हिडिओ पसरवणे, यावरून काँग्रेसची लष्करविरोधी मानसिकता पुन्हा एकदा उघडी पडली आहे. आपल्या सैन्याचा अवमान करणे आणि त्यांची प्रतिमा खराब करणे ही काँग्रेसची जुनीच सवय आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT