Kiren Rijiju | चीनची भारतीय हद्दीत घुसखोरी नाही; स्थानिक स्तरावर समस्या

संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांचे स्पष्टीकरण
Union Minister of Parliamentary Affairs of India Kiren Rijiju
Union Minister of Parliamentary Affairs of India Kiren RijijuPudhari
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अरुणाचल प्रदेशातील चीनच्या कथित घुसखोरीबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरण रिजिजू यांनी ‘चीन भारताच्या हद्दीत ६० किलोमीटर आत घुसला’ असा दावा करणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे. चीनसोबत स्थानिक स्तरावर समस्या आहे. मात्र भारतीय हद्दीत चीनकडून घुसखोरी झालेली नाही, असे ते म्हणाले.

न्यूज एजन्सी आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत रिजिजू यांनी अरुणाचलमधील सीमावादावर भाष्य केले. अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील ताक्सिंग परिसरात चिनी सैनिकांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी) ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर रिजिजू यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. रिजिजू म्हणाले की, अरुणाचल प्रदेशात भारत आणि चीनदरम्यानची सीमा अत्यंत लांब असून तिचे जमिनीवर सर्वत्र स्पष्ट सीमांकन झालेले नाही. त्यामुळे काही भागांमध्ये दोन्ही देशांकडून आपापल्या हद्दीचे वेगवेगळे दावे केले जातात. भारत-तिबेट सीमा पूर्वीपासूनच पूर्णपणे निश्चित केलेली नव्हती.

चीनने आधीच सीमाभागात पायाभूत सुविधा उभारल्या

सीमाभागातील पायाभूत सुविधांच्या मुद्द्यावरून रिजिजू यांनी पूर्वीच्या सरकारवर टीका केली. माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी यांच्या संसदेतील वक्तव्याचा संदर्भ देत रिजिजू म्हणाले की, त्या काळात सीमाभागात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारण्याचे भारताचे धोरण नव्हते. त्याचा फायदा चीनने घेतला आणि त्याने सीमावर्ती भागात रस्ते तसेच इतर सुविधा उभारल्या. त्यावेळी भारताने त्याच वेगाने बांधकाम केले नाही.

२०१४ नंतर सीमाभागातील बांधकामाला वेग

रिजिजू यांच्या मते, २०१४ नंतर भारताने सीमावर्ती पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठा वेग दिला. १९४७ नंतर ज्या दुर्गम सीमाभागांमध्ये रस्ते किंवा इतर सुविधा निर्माण झाल्या नव्हत्या, तिथे आता मोठ्या प्रमाणावर कामे केली आहेत. भारत आता सीमाभागात स्वतःचे रस्ते आणि पायाभूत सुविधा उभारत आहे.

आयटीबीपीची गस्त वाढवली

अरुणाचल प्रदेशातील संबंधित भागात भारताने इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी)ची गस्त आणि देखरेख वाढवली आहे. सीमाभागातील परिस्थितीवर सुरक्षा यंत्रणांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

चीनने गाव ताब्यात घेतलेले नाही...

६० किलोमीटर आत चिनी सैन्य आले असल्याचा दावा फेटाळताना रिजिजू यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले. त्यांच्या म्हणण्यानुसार, चीनने भारतातील एखादे गाव ताब्यात घेतलेले नाही. सीमारेषा ज्या भागात स्पष्टपणे निश्चित झालेली नाही, अशा काही भूभागांमध्ये चिनी सैन्याने तळ उभारले आहेत, असे त्यांनी सांगितले. याच कारणामुळे स्थानिक नागरिक आणि चीनकडून संबंधित भूभागावर परस्परविरोधी दावे केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चिनी हालचाली वाढल्याचे मान्य

सीमेवरील काही भागांमध्ये चीनच्या हालचाली वाढल्याचे रिजिजू यांनी मान्य केले. ते म्हणाले, स्थानिक गावकऱ्यांच्या चिंता गांभीर्याने घेण्याची गरज आहे. पण सोशल मीडियावर खोटे व्हिडीओ आणि दिशाभूल करणारे दावे प्रसारित करणे चुकीचे असून, त्यातून लष्कराचे मनोबल खच्ची होऊ शकते आणि देशात संभ्रम निर्माण होऊ शकतो. अरुणाचलमधील काही भागांबाबत स्थानिक भारतीय दावा करतात की सीमा आणखी पुढे आहे. चीनकडूनही त्यांची हद्द भारतीय भूभागात अधिक आत असल्याचा दावा केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news