

Kiren Rijiju on SIR Protest : बांगलादेश आणि फ्रान्समधील हिंसाचाराप्रमाणेच देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. 'एसआयआर' (SIR) विरोधी निदर्शनांच्या नावाखाली 'देशविरोधी टोळ्या' आणि काही राजकारण्यांनी संगनमत करून तरुणांना भडकवण्याचे आणि रस्त्यांवर हिंसाचार घडवून आणण्याचे काम केले आहे, असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आज केला.
सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये रिजिजू यांनी म्हटले आहे की, काही “भारतविरोधी गट” आणि काही राजकारणी यांनी एकत्र येऊन तरुणांची दिशाभूल केली आणि रस्त्यावर हिंसाचार घडवून आणण्यासाठी कट रचला.
“बांगलादेशमध्ये घडलेली हिंसक घटना असो किंवा फ्रान्समधील दंगली, जाळपोळ आणि लुटमार; असाच धोकादायक कट भारतासाठीही रचला गेला होता. काही भारतविरोधी गट आणि काही नेत्यांनी संगनमत करून तरुणांना चिथावणी दिली आणि आपल्या शहरांमध्ये हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न केला,” असा दावाही त्यांनी केला आहे.
“हा धोकादायक कट रचणाऱ्यांना हा विसर पडला की, भारत हा बांगलादेश किंवा फ्रान्स नाही. भारतात सत्तेत बदल निश्चितपणे होऊ शकतो, पण तो फक्त निवडणुकीच्या माध्यमातूनच शक्य आहे, अन्य कोणत्याही मार्गाने नाही,” असे सांगत रिजिजू यांनी AISA च्या अध्यक्षा नेहा बोरा आणि ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण सत्तेत बदलाचे समर्थन करताना असलेला एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विरोधी पक्षांचे नेते आणि विद्यार्थी कार्यकर्त्यांनी ‘सत्तेत बदल’ करण्याबाबत वक्तव्ये केली होती. या मुद्द्यावरून सध्या राजकारण तापले असून, रिजिजू यांची ही प्रतिक्रिया याच वादाच्या पार्श्वभूमीवर आली आहे.
दरम्यान, प्रशांत भूषण यांनी सरकारच्या या दाव्याचे खंडन केले असून, हे आंदोलन म्हणजे सत्तेत बदल घडवून आणण्यासाठी विरोधकांनी चालवलेले षड्यंत्र असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. “सरकार सातत्याने हेच म्हणत आहे की, हे विरोधकांचे सत्ता परिवर्तनाचे ऑपरेशन आहे. आम्ही केवळ या देशातील संसदीय लोकशाही वाचवण्यासाठी साकडे घाकत आहोत. जर अशी मनमानी सुरूच राहिली, तर सत्तेत बदल निश्चितपणे होईल आणि आम्हा सर्वांनाच तो हवा आहे. यात चुकीचे काय आहे? सत्ता परिवर्तन घडवणे हा प्रत्येक नागरिकाचा लोकशाही अधिकार आहे आणि सरकारविरोधात असंतोष व्यक्त करणे हा काही गुन्हा नाही,” असे प्रशांत भूषण यांनी स्पष्ट केले.