Shocking Court Statements  Pudhari
राष्ट्रीय

Shocking Statement In Court :"मी गांधीजी नाही; गरज पडल्यास..": दुहेरी हत्याकांडातील नराधमाचे कोर्टात थेट व्‍यवस्‍थेला आव्‍हान

संपूर्ण केरळचे लक्ष वेधलेल्‍या खटल्‍यात बुधवारी सुनावणी जाणार शिक्षा

पुढारी वृत्तसेवा

Shocking statement in court : "तुम्हाला हव तर मला फाशीची शिक्षा द्या. मला काहीच वाटणार नाही. गरज पडली तर मी आणखी लोकांनाही संपवून टाकेन. मी काही गांधीजी नाही," अशा भाषेत केरळला हादरवून सोडणाऱ्या पोथुंडी दुहेरी हत्या प्रकरणातील नराधमाने थेट व्‍यवस्‍थेला आव्‍हान दिले. दुहेरी हत्‍या प्रकरणी दोषी ठरविल्‍यानंतर न्यायालयात माफी किंवा दयेची याचना करण्याऐवजी आरोपी चेंथमारा याने केलेले विधानाने न्‍यायाधीशांसह न्‍यायालयतील उपस्‍थितांसाठीही धक्‍कादायक ठरले.

महिलेच्‍या खुनात आरोपीस दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

२०१९ मध्ये, आपल्या वैवाहिक आयुष्यातील विघटनास शेजारी राहणारी सजिथा ही महिला जबाबदार असल्याचा आरोप करत चेंथमाराने तिची हत्या केली होती. त्या प्रकरणात त्याला दोषी ठरवून दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, २०२२ मध्ये त्याला जामीन मंजूर झाला.

जामिनावर सुटताच दुहेरी हत्‍याकांड

जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने अटींचे उल्लंघन केले आणि केवळ सूड घेण्याच्या उद्देशाने तो गुपचूप पालक्काड जिल्ह्यातील पोथुंडी येथे परतला.२७ जानेवारी २०२५ रोजी सुधाकरन आणि त्यांच्या ७५ वर्षीय वृद्ध आई लक्ष्मी यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुहेरी हत्या म्हणजे २०१९ पासून सुरू असलेल्या सूडभावनेचाच एक भाग होती. हतेच्या दिवशी, चेंथमारा आधीच खरेदी केलेल्या कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने सज्ज होऊन आला होता. त्याने सुधाकरन यांच्यावर घराबाहेरच हल्ला चढवून त्यांची हत्या केली. मुलाचा वाचवा-वाचवा असा ओरडण्याचा आवाज ऐकून ७५ वर्षीय आई लक्ष्मी या बाहेर धावल्या. नराधम चेंथमाराने वृद्धेचीही दया न माया बाळगता त्यांच्यावरही जीवघेणा हल्ला केला. यामध्‍ये दोघेही जागीच ठार झाले.

जंगलात पलायन आणि पोलिसांची मोठी शोधमोहीम

दुहेरी हत्येनंतर आरोपी चेंथमाराने जवळच असलेल्या मट्टाई जंगलात पोबारा केला. पोलिसांनी जंगलात कॉम्बिंग ऑपरेशन राबवले. दोन दिवस चाललेल्या थरारक शोधमोहिमेनंतर अखेर पोलिसांनी त्याच्‍या मुसक्‍या आवळल्‍या होत्‍या.

चेंथमाराने तयार केली होती 'हिट लिस्‍ट'

तपासादरम्यान पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली. दुहेरी हत्या म्हणजे एका मोठ्या कटाचा भाग होती. चेंथमाराने कोणाचा खून करायचा याची एक 'हिट लिस्ट' तयार केली होती. यामध्‍ये त्याची विभक्त झालेली पत्नी, मुलगी, पोलीस अधिकारी असलेला जावई, मेहुणा आणि परिसरातील इतर तीन महिलांचा समावेश होता. सुदैवाने त्याआधीच त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले होते.

४८० पानांचे दोषारोपपत्र ठरले निर्णायक

दुहेरी हत्‍या खटल्याच्या सुनावणीदरम्यान एकूण १३२ साक्षीदारांचे जबाब नोंदवणयात आले. यातील चार साक्षीदार फितूर झाले. त्यामुळे खटल्याला वेगळे वळण मिळण्याची शक्यता होती. मात्र, तपास यंत्रणेने गोळा केलेले फॉरेन्सिक आणि वैज्ञानिक पुरावे अत्यंत भक्कम होते. सरकारी पक्षाने सादर केलेल्या ४८० पानांच्या विस्तृत दोषारोपपत्रामुळे आणि सबळ पुराव्यांमुळे चेंथमाराला दोषी ठरवण्यात न्यायालयात यश आले.

मी काही गांधीजी नाही...

न्यायाधीशांनी शिक्षा सुनावण्यापूर्वी चेंथमाराला त्याचे म्हणणे मांडण्याची शेवटची संधी दिली होती. मात्र, न्यायालयात माफी किंवा दयेची याचना करण्याऐवजी . तो म्हणाला, "तुम्हाला हवी ती फाशीची शिक्षा द्या. मला काहीच वाटत नाही. गरज पडली तर मी आणखी लोकांनाही संपवून टाकेन. मी काही गांधीजी नाही." आपल्या क्रूर कृत्याचे समर्थन करताना त्याने न्यायाधीशांना उद्देशून म्हटले की, "मी ज्या परिस्थितीचा सामना केला, तशी परिस्थिती जर तुमच्यावर ओढवली असती, तर तुम्हीही कदाचित तेच केले असते जे मी केले." न्यायालय या प्रकरणातील अंतिम शिक्षेची घोषणा बुधवार, १५ जुलै रोजी करणार आहे. संपूर्ण केरळचे लक्ष या शिक्षेकडे लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT