काँग्रेस खासदार शशी थरुर.  File Photo
राष्ट्रीय

Kerala Gulf Migrants : सौदीहून परतणाऱ्या केरळच्या मुस्लिमांमध्‍ये वाढतीय कट्टरता; वर्ल्ड बँकेच्या अहवालावर थरुरांची चिंता

जागतिक बँकेचा २०२२मधील अहवाल पुन्‍हा एकदा आला चर्चेत

पुढारी वृत्तसेवा

kerala gulf migrants radicalisation world bank report

गेल्या अनेक दशकांपासून केरळ आणि गल्फ देशांमधील संबंध हे केवळ तेथून येणाऱ्या अर्थकारणाशी जोडले गेले आहेत. परदेशात काम करणाऱ्या मल्याळी नागरिकांनी पाठवलेला पैसा, बांधलेली घरे आणि त्यामुळे बदललेले राहणीमान यावरच आजवर चर्चा झाली. मात्र, वर्ल्ड बँकेच्या (जागतिक बँक) एका संशोधनातून स्थलांतराचा एक 'चिंताजनक' पैलू समोर आला आहे. सौदी अरेबिया आणि इतर गल्फ देशांमधून परतणाऱ्या स्थलांतरितांच्या सामाजिक, लैंगिक दृष्टिकोनात आणि कौटुंबिक हिंसाचाराकडे पाहण्याच्या मानसिकतेत झालेला बदल या अभ्यासाने अधोरेखित केला आहे.

२०२२मधील अहवाल पुन्‍हा एकदा चर्चेत

वर्ल्ड बँकेच्या या शोधनिबंधानुसार, सौदी अरेबियातून परतणाऱ्या पुरुषांमध्ये महिलांवरील शारीरिक हिंसाचाराचे समर्थन करणारी टोकाची मानसिकता दिसून आली आहे. हा अहवाल मार्च २०२२ मध्ये प्रकाशित झाला होता; परंतु तो आता चर्चेत आला आहे. तिरुवअनंतपुरमचे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी या अभ्यासातील निष्कर्षांवर तीव्र चिंता व्यक्त करत मुस्लिम समाजाला अंतर्गत आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले आहे.

महिलांवरील हिंसाचार आणि कट्टर विचारसरणी

वर्ल्ड बँकेच्या संशोधनात असे दिसून आले होते की, सौदी अरेबियातून केरळमध्ये परतलेले स्थलांतरित, परदेशात न गेलेल्या नागरिकांच्या तुलनेत लिंगभाव, कौटुंबिक निर्णय आणि कौटुंबिक हिंसाचार या बाबतीत अधिक कट्टर आणि बुरसटलेल्या विचारांचे आहेत.

केरळमध्‍ये इस्‍लामची उदारमतवादी परंपरा : शशी थरुर

जागतिक बँकेच्‍या अहवालावरील निष्कर्षांवर प्रतिक्रिया देताना खासदार शशी थरूर म्हणाले, "केरळमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या इस्लामची एक उदारमतवादी आणि पुरोगामी परंपरा राहिली आहे. ही परंपरा राज्याच्या सहअस्तित्व आणि धार्मिक सौहार्दाशी सुसंगत आहे. मुस्लिम मुली आणि महिलांना पुरुषांच्या बरोबरीने शिक्षण देण्यात केरळला नेहमीच अभिमान राहिला आहे. मात्र, परदेशातून येणारी ही कट्टर आणि बुरसटलेली मानसिकता केरळच्या सामाजिक परंपरेशी पूर्णपणे विसंगत आहे. यावर मुस्लिम समाजाने गंभीरपणे विचार आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे."

पंतप्रधानांच्या सल्लागार समितीकडूनही दुजोरा

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्या शामिका रवी यांनीही या अहवालावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "हे निष्कर्ष गेल्या ३ दशकांपासून केरळमधून येत असलेल्या विविध अनधिकृत अहवालांना आणि निरीक्षणांना पुष्टी देतात. सौदीहून परतलेल्या पुरुषांचा महिलांवरील हिंसाचाराबाबतचा दृष्टिकोन इतर नागरिकांपेक्षा खूपच जास्त कट्टर आहे, ही आपल्या सर्वांसाठीच चिंतेची बाब आहे."

वर्ल्ड बँकेच्या अभ्यासातील धक्कादायक आकडेवारी

  • सौदीहून परतलेल्या ४३% पुरुषांच्या मते पत्नीने आज्ञा पाळली नाही तर नवऱ्याला तिला मारण्याचा अधिकार आहे. (इतर गल्फ देशांतून परतलेल्यांमध्ये हे प्रमाण ३७% आहे.)

  • ७५.३% सौदी रिटर्न पुरुषांच्या मते पत्नी किंवा मुलगी घराबाहेर मोकळेपणाने वावरली तर पुरुषाचा समाजातला मान कमी होतो.

  • ५३% सौदी रिटर्न पुरुषांच्या मते रात्रीच्या वेळी एकटी बाहेर पडणाऱ्या महिलेवर छेडछाड किंवा अत्याचार झाल्यास ती स्वतःच जबाबदार असते. तर ७०% पुरुषांच्या मते महिलांचे 'अयोग्य कपडे' पुरुषांना गैरवर्तनासाठी प्रवृत्त करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT