Shocking Crime News : कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यातील एका ६५ वर्षीय कपडा व्यापाऱ्याने आपल्या पत्नीची आणि मुलाचा खून करून स्वतः जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जीवन संपवण्यापूर्वी व्यापाऱ्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली असून, यामध्ये त्याने वाढते कर्ज, कर्जफेडीचा दबाव आणि व्यवसायात झालेल्या नुकसानीचा उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे, या नुकसानीसाठी व्यापाऱ्याने राज्य सरकारच्या मोफत बस प्रवास योजनेला (शक्ती योजना) जबाबदार धरले आहे.
प्रभाकर (६५) हे कापड व्यापारी होते. मंगळवारी (दि. ९ जून) त्यांची पत्नी ज्योती (५५) आणि मुलगा संतोष (२८) यांचे मृतदेह ते राहत असलेल्या भाड्याच्या घरात आढळले. संतोषची पत्नी मेघना हिने हे मृतदेह पाहिले, तेव्हा ही धक्कादायक घटना उघडकीस आली. मेघना आणि संतोष यांचे याच वर्षी २६ एप्रिल रोजी लग्न झाले होते. यानंतर नातेवाईकांनी प्रभाकर यांचा शोध घेतला असता त्यांनी कपड्याच्या दुकानात गळफास घेऊन जीवन संपविल्याचे निदर्शनास आले.
प्रभाकर यांची सून मेघनाने दिलेल्या जबाबानुसार, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास सर्व कुटुंबीयांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर ते झोपायला गेले. मंगळवारी सकाळी ६.३० च्या सुमारास जाग आल्यानंतर मेघनाने घरातील कामे आणि पूजा उरकली. त्यानंतर सासूला उठवण्यासाठी गेली असता खोलीला कुलूप होते. खोली उघडली असता तिला दोघांचे मृतदेह दिसले. रात्रीच्या वेळी कोणताही संशयास्पद आवाज आला नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाकर यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या कृत्याचे कारण लिहिले आहे. आर्थिक संकट, गृहकर्जाचे (Home Loan EMI) हप्ते फेडण्याचा दबाव आणि व्यवसायातील तोटा याचा उल्लेख त्यांनी केला आहे. तसेच राज्य सरकारच्या मोफत बस योजनेमुळे बसची वारंवारता आणि सोय वाढल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आणि उत्पन्न घटले, असा दावा त्यांनी या चिठ्ठीत केला आहे.
प्रभाकर यांच्या घरात एक चिठ्ठी सापडली आहे. त्यामध्ये त्यांनी गृहकर्ज घेतल्याचे आणि त्याचा ईएमआय भरण्यासाठी दबाव असल्याचे नमूद केले आहे. तसेच व्यवसायात मोठे नुकसान झाल्याचे आणि स्वतः ज्योती व मुलाची हत्या केल्याचेही त्यांनी लिहिले आहे," अशी माहिती मंड्याच्या पोलीस अधीक्षक (SP) शोभा राणी व्ही. जे. यांनी 'पीटीआय'ला दिली.
प्रभाकर यांनी आधी पत्नी आणि नंतर मुलाचा गळा आवळून खून केला असावा आणि त्यानंतर दुकानात जाऊन जीवन संपवले असावे, असा संशय पोलिसांना आहे. दोन्ही मृतदेहांवर गळा आवळल्याच्या खुणा आढळल्या आहेत, परंतु घटनेचा अचूक क्रम शवविच्छेदन (Post-mortem) आणि फॉरेन्सिक अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गुन्ह्यासाठी वापरले गेलेले धोतर घरातून जप्त करण्यात आले आहे. 'सीन ऑफ क्राईम ऑफिसर्स' आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) च्या पथकांनी घटनास्थळाची पाहणी केली.
कौटुंबिक कर्जाची मेघनाला पूर्ण कल्पना होती, कारण लग्नाच्या वेळीही यावर चर्चा झाली होती. तसेच घटनेच्या आदल्या रात्री घरात कोणतेही भांडण किंवा संशयास्पद घटना घडली नव्हती, असेही तिने पोलिसांना सांगितले. प्रभाकर यांनी जीवन संपवण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत खासगी सावकारांकडून होणारा छळ आणि चक्रवाढ व्याजाच्या वाढत्या बोजाचाही उल्लेख असून, यामुळे कुटुंब प्रचंड आर्थिक तणावाखाली होते. मृत प्रभाकर आणि ज्योती यांच्या पश्चात एक अविवाहित मुलगी असून ती बेंगळुरूमधील एका आयटी कंपनीत कार्यरत आहे.