Annamalai BJP Resignation : तमिळनाडूतील माजी आयपीएस अधिकारी व भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यानंतर अण्णामलाई यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून समर्थक आणि जनतेशी संवाद साधताना भविष्यातील वाटचाल स्पष्ट केली.
आपल्या समर्थकांशी संवाद साधताना अण्णामलाई म्हणाले की, लवकरच नवा राजकीय पक्ष स्थापन करणार आहे. "राज्यातील व्यक्तीकेंद्री आणि घराणेशाहीचे राजकारण संपवणे हाच माझ्या प्रस्तावित राजकीय चळवळीचा मुख्य उद्देश असेल," अशी घोषणा अण्णामलाई यांनी केली. तामिळनाडूतील जनतेला ते नेतृत्वाचा एक नवा आणि सक्षम पर्याय देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मी भाजपचा कार्यकर्ता आहे की तमिळ व्यक्ती, हा माझ्यासाठी मोठा पेच होता. मी ४ डिसेंबर २०२५ रोजी पक्षाला सांगितले की मी राजीनामा देणार आहे. त्यावर पक्षाने मला निवडणुका पूर्ण करून मगच जाण्यास सांगितले. होते, असा खुलासा करत लवकरच नवा राजकीय पक्ष स्थापन करणार असून हा पक्ष आगामी सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढवेल. तामिळनाडूला एका नव्या राजकीय मार्गावर नेण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
राजीनाम्यानंतर अण्णामलाई यांनी आपण भाजपमध्ये का आलो होतो, याचा रंजक खुलासाही केला. ते म्हणाले, "मी भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एल. संतोष यांनी दिलेल्या आश्वासनावर आणि त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला होता. माझ्या भाजप प्रवेशाबाबत आजवर अनेक तर्कवितर्क लावले गेले, त्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी मी आज ही गोष्ट जाहीर करत आहे."
अण्णामलाई यांनी आपल्या आगामी राजकीय प्रवासाची दिशा स्पष्ट करताना 'सामान्य माणसाचे राजकारण' करण्याची घोषणा केली आहे. "आता आपल्याला व्यक्तीकेंद्री राजकारणातून बाहेर पडण्याची गरज आहे. तामिळनाडूला आता सामान्य माणसाच्या राजकारणाची गरज आहे," असे ते म्हणाले.
आपल्या भविष्यातील योजनांचे संकेत देत त्यांनी मोठी घोषणा केली: "मी आगामी सार्वत्रिक निवडणूक पूर्णपणे स्वतंत्रपणे लढणार आहे. या विचाराला कोणताही पर्याय नाही. सर्व घटकांना एकत्र आणून पुढे जाणे हेच आमचे ध्येय असेल," अशीही माहिती त्यांनी दिली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष श्री के. अण्णामलाई यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा स्वीकारला आहे," असे भाजपने आज एका निवेदनात म्हटले आहे. अण्णामलाई यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाचे "काहीही नुकसान" होणार नाही,भाजप हा जगातील एक मोठा पक्ष आहे असा दावा तमिळनाडू भाजपचे प्रमुख नैनार नागेंद्रन यांनी केला आहे. दरम्यान, आंध्र प्रदेश भाजप प्रमुखांची भूमिका मात्र थोडी वेगळी होती; अण्णामलाई भविष्यात कधीतरी पक्षात परत येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.