

संजीव ओक
द्रमुकचा पराभव आणि अभिनेता विजयने मिळवलेले दणदणीत यश, या पार्श्वभूमीवर अण्णामलाई यांचा भाजप सोडण्याचा निर्णय तमिळ राजकारणात नव्या प्रादेशिक अस्मितेचा आणि एका वादळी राजकीय पर्वाचा उदय मानला जात आहे.
के. अण्णामलाई यांनी भाजपला ठोकलेला रामराम ही संपूर्ण देशाच्या राजकीय वर्तुळात नॅशनल न्यूज ठरली. यामागे काही अत्यंत ठोस कारणे आहेत. गेल्या काही वर्षांत भाजपने आपले मिशन साऊथ यशस्वी करण्यासाठी तामिळनाडूत ताकद पणाला लावली होती. अण्णामलाई हे निव्वळ एक माजी प्रदेशाध्यक्ष नव्हते, तर ते दक्षिण भारतात भाजपचे कमळ फुलवण्यासाठी अतोनात कष्ट करणारे नेते होते. सिंघम आयपीएस अधिकारी ते तमिळनाडू भाजपचा आक्रमक चेहरा, असा त्यांचा प्रवास देशभरातील माध्यमांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास पाहता त्यांचे पक्षातून बाहेर पडणे हा राष्ट्रीय पक्षाच्या विस्तारवादी धोरणाला बसलेला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
अण्णामलाई यांच्या राजीनाम्याची आणि नव्या राजकीय वाटचालीची पाळेमुळे नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या निकालात दडली आहेत. भारतीय राजकारणाच्या इतिहासात तामिळनाडूचे स्थान नेहमीच वेगळे आणि काहीसे स्वतंत्र राहिले आहे. उत्तरेकडील राजकीय वाऱ्यांचा प्रभाव विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेत सहसा पोहोचत नाही, हा आजवरचा प्रघात होता. पेरियार यांच्या विचारधारेतून जन्मलेल्या आणि अण्णादुराई, एम. करुणानिधी, एम. जी. रामचंद्रन व जे. जयललिता यांच्यासारख्या दिग्गजांनी वाढवलेल्या द्रविडी राजकारणाने तब्बल पाच दशकांहून अधिक काळ या राज्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवले. मात्र, राजकारणातील कोणताही गड हा कधीही अभेद्य नसतो, हे आता तामिळनाडूत पुन्हा एकदा सिद्ध झाले. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक या बलाढ्य पक्षाचा झालेला अस्त ही एका पक्षाची हार नाही, तर ती एका राजकीय युगाची अखेर आहे.
आशेचा एक नवा किरण म्हणून थलपती अभिनेता विजय याने राजकारणात प्रवेश केला आणि पाहता पाहता त्याने संपूर्ण राज्यात आपला झेंडा रोवला. तामिळनाडू आणि चित्रपटसृष्टी यांचे नाते फार जुने आहे. मात्र, शिवाजी गणेशन किंवा कमल हासन यांच्यासारख्या दिग्गजांना जे जमले नाही, ते विजयने कसे साध्य केले, हा देशभरातील राजकीय विश्लेषकांसाठी एक अभ्यासाचा विषय ठरला आहे.
विजयच्या विजयाचा नेमकेपणाने अभ्यास केल्यास असे लक्षात येते की, त्याने केवळ स्टारडमवर विसंबून न राहता अत्यंत सूक्ष्म पातळीवर राजकीय बांधणी केली. राजकारणात येण्यापूर्वीच त्याने विजय मक्कल इयक्कम या आपल्या फॅन क्लबचे रूपांतर एका सामाजिक संघटनेत केले. कोव्हिडच्या काळात मोफत अन्नछत्रे चालवणे, गरीब विद्यार्थ्यांसाठी रात्रशाळा सुरू करणे आणि पूरस्थितीत प्रशासनाच्या आधी पोहोचून मदत करणे या त्याच्या कामांमुळे तो लोकांच्या गळ्यातील ताईत बनला. आपला राजकीय पक्ष स्थापन करताना त्याने स्पष्टपणे सांगितले होते की, माझा पक्ष हा केवळ सत्तेचा उपभोग घेण्यासाठी नाही, तर तमिळ जनतेच्या सेवेसाठी जन्मलेला एक निखळ विचार आहे. त्याच्या या प्रामाणिक आणि तळागाळातील भावनिक आवाहनाने जातीपातीचे सर्व जुने गणित मोडून काढले आणि एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली. द्रविडी पक्षांनी तमिळ भाषा, संस्कृती आणि राज्याच्या अधिकारांवर नेहमीच मक्तेदारी गाजवली होती. आता द्रविडी पक्ष सत्तेतून बाहेर गेले असताना नेमक्या याच वेळी के. अण्णामलाई यांनी एक अत्यंत धाडसी आणि अनपेक्षित निर्णय घेत आपली नवी राजकीय चळवळ सुरू करण्याची घोषणा केली.
अण्णामलाई यांच्या हे लक्षात आले होते की, भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाच्या चौकटीत राहून तामिळनाडूत तमिळ राष्ट्रवादाचे राजकारण करणे अत्यंत कठीण आहे. दिल्लीतील हाय कमांडचे नियंत्रण, हिंदी भाषेचा वाढता प्रभाव आणि उत्तरेकडील राजकीय संस्कृती यामुळे तमिळ जनतेच्या मनात राष्ट्रीय पक्षांबद्दल नेहमीच अविश्वास राहिला आहे. आपल्या नव्या प्रवासाबद्दल बोलताना अण्णामलाई यांनी अत्यंत सूचक विधान केले. ते म्हणाले, तमिळ मातीची अस्मिता आणि दिल्लीचे राजकारण यात कधीही तडजोड होऊ शकत नाही. तमिळनाडूला अशा एका नेतृत्वाची गरज आहे, जे फक्त तमिळ जनतेला बांधील असेल, दिल्लीतील कोणत्याही सत्तेला नाही. अण्णामलाई यांचा हा स्पष्ट संदेश होता की, त्यांना आता तमिळ राजकारणातील तो रिकामा झालेला तमिळ राष्ट्रवादाचा आणि अस्मितेचा केंद्रबिंदू काबीज करायचा आहे. एकेकाळी नाम तमिळर काचीचे सीमान यांनी केवळ भावनिक मुद्द्यांवर आणि प्रखर तमिळ राष्ट्रवादावर राज्यात सात ते दहा टक्के मते सातत्याने मिळवली होती. अण्णामलाई यांनी याचाच अभ्यास करून आता अधिक आक्रमकपणे आणि आपल्या प्रशासकीय अनुभवाच्या बळावर ती जागा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
आता तामिळनाडूचे राजकारण एका अत्यंत रंजक आणि निर्णायक वळणावर येऊन पोहोचले आहे. एकेकाळी द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांच्यात फिरणारे राजकारण आता पूर्णपणे बदलले आहे. विजय आणि अण्णामलाई यांच्या रूपाने तामिळनाडूला दोन तरुण, आक्रमक आणि प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देणारे नेते मिळाले आहेत. विजयचे राजकारण हे सर्वसमावेशक आणि सुशासनावर आधारित आहे, तर अण्णामलाई यांचे राजकारण हे प्रखर तमिळ अस्मिता आणि राष्ट्रवादावर केंद्रित आहे.
या संपूर्ण स्थित्यंतरावर चेन्नईतील ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राधाकृष्णन अत्यंत मार्मिक भाष्य करतात. ते म्हणतात, अण्णामलाई यांचा हा निर्णय तामिळनाडूच्या राजकारणातील एका मोठ्या राजकीय भूकंपाची नांदी आहे. आतापर्यंत येथील राजकारण द्रविडी आणि राष्ट्रीय या दोन ध्रुवांभोवती फिरत होते. मात्र, द्रमुकचा पराभव, विजयचा उदय आणि अण्णामलाई यांची नवी चळवळ यातून प्रखर तमिळ राष्ट्रवाद विरुद्ध लोकप्रिय सुशासन असा एक नवा पर्याय आकार घेत आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का आहे; पण तामिळनाडूच्या प्रादेशिक राजकारणासाठी हा एक नवा श्वास आहे.
अण्णामलाई यांनी निवडलेला हा मार्ग अजिबात सोपा नाही. देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय पक्षाची अफाट साधनसंपत्ती सोडून शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण करणे, हे एक मोठे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. मात्र, आगामी काळ हा या दोन युवा नेत्यांमधील संघर्षाचा नसून, तो एका नव्या वैचारिक लढाईचा असणार आहे. या लढाईत अंतिम विजय कोणाचा होईल हे सांगणे आताच कठीण असले तरी, एका गोष्टीवर मात्र शिक्कामोर्तब झाले आहे, ते म्हणजे तामिळनाडूने आता पारंपरिक आणि घराणेशाहीच्या राजकारणाला कायमची मूठमाती दिली आहे. राज्याच्या या नव्या राजकीय कथानकात पुढे काय नाट्य घडते, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. तामिळनाडूच्या राजकीय मानसिकतेत झालेली ही एक अभूतपूर्व क्रांती आहे, असेच या निमित्ताने म्हणावे लागेल.