

AIADMK Split Tamil Nadu
चेन्नई : विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) सरकारच्या बाजूने मतदान केल्यामुळे AIADMK प्रमुख ईडापड्डी के. पलानीस्वामी (EPS) यांनी मोठी कारवाई केली आहे. पक्षादेश धुडकावून क्रॉस वोटिंग करणाऱ्या सी. व्ही. षणमुगम आणि एस. पी. वेलुमणी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना पक्षाच्या पदांवरून हटवण्यात आले आहे.
AIADMK प्रमुख ईडापड्डी के. पलानीस्वामी यांनी १३ विद्यमान आमदारांसह एकूण २९ नेत्यांची जिल्हा सचिव आणि इतर महत्त्वाच्या पदांवरून हकालपट्टी केली आहे. यामध्ये आर. कामराज, सी. विजयभास्कर, थंगमणी, के. पी. अनबझगन, के. सी. वीरमणी आणि एम. आर. विजयभास्कर यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे.
विधानसभेत झालेल्या विश्वासदर्शक ठरावात २५ AIADMK आमदारांनी टीव्हीके (TVK) सरकारच्या बाजूने मतदान केले. यामुळे अभिनेता विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विधानसभेत सहज बहुमत सिद्ध केले.
२३४ सदस्यांच्या विधानसभेत विजय यांच्या पक्षाने १०८ जागा जिंकल्या होत्या, बहुमताच्या आकड्यापेक्षा (११८) कमी होत्या. मात्र, काँग्रेस, डावे पक्ष, IUML आणि AIADMK मधील बंडखोर गटाच्या मदतीने सरकारने १४४ आमदारांच्या पाठिंब्यासह विश्वासदर्शक ठराव जिंकला.
विश्वासदर्शक ठरावानंतर ज्येष्ठ नेते सी. व्ही. षणमुगम यांनी थेट पलानीस्वामी (EPS) यांच्याविरुद्ध बंड पुकारले. ईपीएस यांनी पक्षाची मूळ विचारसरणी सोडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता AIADMK प्रमुख ईडापड्डी के. पलानीस्वामी यांनी १३ विद्यमान आमदारांसह एकूण २९ नेत्यांची जिल्हा सचिव आणि इतर महत्त्वाच्या पदांवरून हकालपट्टी केल्याने AIADMK मधील अंतर्गत पेच आता अधिक गडद झाला असून तामिळनाडूच्या राजकारणाला नवीन वळण मिळाले आहे.