प्रतीकात्मक छायाचित्र AI-generated image
राष्ट्रीय

PROPERTY RIGHTS : 'घरजावई' प्रथेला हायकोर्टाने फेटाळले! महिलांच्‍या वारसाहक्‍कांबाबत उच्‍च न्‍यायालयाने कोणता आदेश दिला?

PROPERTY RIGHTS : पारंपरिक 'घरजावई' प्रथेनुसार विवाह न केल्यामुळे मुलींना वारसाहक्कापासून वंचित ठेवता येणार नाही

पुढारी वृत्तसेवा

Santhal Women Property Rights Jharkhand High Court : केवळ पारंपरिक 'घरजावई' प्रथेनुसार विवाह न केल्यामुळे मुलींना वारसाहक्कापासून वंचित ठेवता येणार नाही, असे स्पष्ट करत झारखंड उच्च न्यायालयाने संथाळ आदिवासी समुदायातील मुलींना त्यांच्या वडिलांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत वारसाहक्क मिळण्याचा अधिकार कायम ठेवला आहे.

वडिलोपार्जित जमिनीवरून प्रदीर्घ न्यायालयीन वाद

जामताडा जिल्ह्यातील कुंडहित पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुर्का गावातील वडिलोपार्जित जमिनीवरून हा वाद सुरू होता. महिलेने १९८५ मध्ये आपल्या वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीची मालकी आणि ताबा मिळावा, यासाठी दिवाणी दावा केला होता. १९९६ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने तिला संपत्तीतील केवळ एक तृतीयांश हिस्सा मंजूर केला होता.

कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान

कनिष्ठ न्यायालयाच्या या आदेशाविरोधात वादीने पहिल्या अपिलीय न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ४ मार्च २००६ रोजी मूळ आदेशात बदल करत संपूर्ण संपत्तीवर तिचा हक्क मान्य केला. या निर्णयाला प्रतिवादींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

संथाळ समुदायाच्या पारंपरिक प्रथेवरून युक्तिवाद

संथाळ समुदायाच्या पारंपरिक प्रथेनुसार मुलींना वडिलांच्या संपत्तीत वारसाहक्क नाही. घरजावई पद्धतीनुसार विवाह झाला तरच ती संपत्तीवर दावा करू शकते; कारण या पद्धतीत जावयाला दत्तक पुत्राचा दर्जा दिला जातो, असा युक्तिवाद अपीलकर्त्यांच्या वतीने विधिज्ञ जयप्रकाश झा यांनी केला. तर न्यायालयीन मित्र (ॲमिकस क्युरी) म्हणून काम पाहणारे विधिज्ञ सुमित गरोडिया यांनी महिलेच्या वतीने युक्तिवाद केला.

प्रथा आवश्यकतेनुसार पाळली जात असल्याचे सिद्ध करावे लागते : उच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निकालांचा दाखला देत झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एम. एस. सोनक आणि न्यायमूर्ती राजेश शंकर यांच्या खंडपीठाने २३ नोव्हेंबर २०२६ रोजी स्पष्ट केले की, सर्वसाधारण कायदा किंवा समानतेच्या तत्त्वांच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही प्रथेचा आधार घ्यायचा झाल्यास ती प्रथा प्राचीन, निश्चित, तर्कसंगत आणि संबंधित समुदाय किंवा भागात सातत्याने व आवश्यकतेनुसार पाळली जात असल्याचे सिद्ध करावे लागते. मात्र, अपीलकर्ते अशी प्रथा अस्तित्वात असल्याचे सिद्ध करण्यात अपयशी ठरले आहेत.

सिद्ध झालेली प्रथा नसताना मुलींशी भेदभाव करणे लोकहिताच्या विरोधात

बदलती लोकभावना आणि वाढती सामाजिक जागरूकता यामुळे संथाळ समुदायातील प्रथांमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले असून, विशेषतः महिलांचा दर्जा उंचावणे आणि त्यांच्या मालमत्तेच्या हक्कांना मान्यता देण्याकडे कल वाढला आहे, असेही खंडपीठाने निरीक्षण नोंदवले. स्पष्ट कायदेशीर बंदी किंवा ठामपणे सिद्ध झालेली प्रथा नसताना मुलींशी भेदभाव करणे हे घटनात्मक नैतिकता आणि लोकहिताच्या विरोधात ठरेल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

एकलपीठांच्या परस्परविरोधी निरीक्षणांचीही न्यायालयाने केली तपासणी

संथाळ वारसा हक्क कायद्यासंदर्भातील दोन पूर्वीच्या एकलपीठांच्या परस्परविरोधी निरीक्षणांचीही उच्च न्यायालयाने तपासणी केली. ‘करण मुर्मू विरुद्ध संथाळ परगणा आयुक्त’ आणि ‘नारायण सोरेन विरुद्ध रंजन मुर्मू’ या दोन प्रकरणांतील नोंदींचा आढावा घेतल्यानंतर, नारायण सोरेन खटल्यातील तत्त्वे सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक ‘मधु किश्वर’ निकालाशी आणि घटनात्मक तत्त्वांशी सुसंगत असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.

चार दशके जुना जमीन वाद निकालात

संथाळ महिलांच्या संपत्तीच्या हक्कांबाबत नारायण सोरेन निकालातील तत्त्वेच ग्राह्य धरली जातील आणि मुलगा नसल्यास मुलगी केवळ घरजावई पद्धतीने कुटुंबात राहणाऱ्या पुरुषाशी विवाहबद्ध झाली नाही, म्हणून तिला वडिलांच्या मालमत्तेपासून डावलता येणार नाही, असे स्पष्ट करत मुख्य न्यायमूर्ती एम. एस. सोनक आणि न्यायमूर्ती राजेश शंकर यांच्या खंडपीठाने जामताडा जिल्ह्यातील सुमारे चार दशके जुन्या जमीन वादाशी संबंधित अपील फेटाळून लावले. या निकालाद्वारे कनिष्ठ अपिलीय न्यायालयाने संपूर्ण वडिलोपार्जित संपत्तीवर मुलीचा हक्क मान्य करणारा हुकूमनामा कायम ठेवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT