Jalaluddin alias Changur Baba get 500 crore rupees for religious conversion in India from Islamic counties
पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात अटक करण्यात आलेल्या जलालुद्दीन उर्फ चंगूर बाबा याच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर धर्मांतर रॅकेट चालविल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अलीकडील तपासात या रॅकेटला इस्लामी देशांतून मिळालेला परदेशी निधी, नेपाळमधील 100 हून अधिक बँक खात्यांमधून भारतात पाठवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अमर उजाला या वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यातील माहितीनुसार, चंगूर बाबाने मागील तीन वर्षांत सुमारे 500 कोटींचा परदेशी निधी प्राप्त केला आहे. आतापर्यंत सुरक्षा यंत्रणांनी 200 कोटींचा निधी ट्रॅक केला असून उर्वरित 300 कोटी नेपाळमधील बँक खात्यांमध्ये पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
नेपाळमधील नवलपरासी, रुपन्देही, बांके आणि काठमांडू या जिल्ह्यांतील 100 हून अधिक बँक खाती वापरून पाकिस्तान, दुबई, सौदी अरेबिया आणि तुर्कीमधून निधी भारतात पाठवण्यात आला. हे पैसे नेपाळमध्ये काढून एजंटमार्फत भारतात चंगूरच्या नेटवर्ककडे सुपूर्त करण्यात आले.
या कामासाठी एजंटना 4-5 टक्के कमिशन दिले जात होते. बिहारच्या सीमावर्ती जिल्ह्यांतील एजंटांनी देखील हे पैसे भारतात पोहोचवण्यासाठी मदत केली.
या निधीचा सर्वाधिक वापर अयोध्येत धर्मांतर मोहिमांसाठी झाला असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. 2023 मध्ये बिहारमध्ये अटक करण्यात आलेल्या एका एजंटनेही अशीच माहिती दिली होती, परंतु त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नव्हते.
नेपाळमधून काढलेले पैसे तेथील चलनात बदलून भारतातील बिनदस्त सीमावर्ती भागांत मनी एक्सचेंजरद्वारे रूपांतरित करण्यात आले. बहरेच, बलरामपूर, श्रावस्ती, सिद्धार्थनगर, महाराजगंज आदी ठिकाणी ही देवाण-घेवाण झाली. काही रकमा हवाला मार्गेही भारतात आणण्यात आल्याने त्यांच्या नोंदी मिळणे कठीण ठरत आहे.
नवीन रोहरा या आरोपीच्या 6 बँक खात्यांमध्ये एकूण 34.22 कोटी रुपयांची उलाढाल झाली.
चंगूर बाबाची विश्वासू सहकारी नितू उर्फ नसरीन हिच्या 8 खात्यांमध्ये फेब्रुवारी ते जून 2021 दरम्यान 13.90 कोटी रूपये जमा झाले.
चंगूरशी संबंधित अन्य स्थानिक खात्यांमध्ये परदेशातून थेट 6 लाख रुपये जमा झाल्याचेही निदर्शनास आले आहे.
चंगूर बाबा गेल्या 15 वर्षांपासून बेकायदेशीर धर्मांतर मोहिमांमध्ये सक्रीय असल्याचे वृत्त आहे. अलीकडेच उत्तर प्रदेश एटीएसकडून त्याला अटक करण्यात आली असून सध्या सखोल चौकशी सुरू आहे. पुण्याचा रहिवासी मोहम्मद अहमद याचीही भूमिका तपासली जात आहे.
सक्तवसुली संचलनालय (ED) आणि आयकर विभाग यांनाही या प्रकरणात सहभागी करण्यात आले असून, चंगूर बाबा आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या 40 बँक खात्यांची तपासणी सुरू आहे.