

Train stops for 2 hours as Elephant gives birth on railway track viral video
रांची : झारखंडमध्ये एका हत्तीणीने रेल्वे रुळांवरच पिलाला जन्म दिल्याने, रेल्वे प्रशासनाने अद्वितीय संवेदनशीलता दाखवत ट्रेन तब्बल दोन तास थांबवली.
या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी स्वतः हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर शेअर करत हा प्रसंग "करुणेचे जिवंत उदाहरण" असल्याचे म्हटले आहे.
ही घटना 25 जून रोजी झारखंडमधील रामगढ विभाग कार्यालयीन क्षेत्रातील बर्काकाना-हजारीबाग रस्त्यावर, सरवाहा गावाजवळील रांची–कोडरमा रेल्वेमार्गावर घडली. या मार्गाला ‘हत्ती गलियारा’ म्हणूनही ओळखले जाते
पहाटे 3 वाजता वन रक्षकांनी डीएफओ नीतीश कुमार यांना फोन करून सांगितले की गर्भवती हत्तीण प्रसूतिपीडेत असून रुळांवर पडलेली आहे.
तिच्या आणि पिल्लाच्या जीवावर संकट येऊ शकते. त्यामुळे तातडीने रेल्वे कंट्रोल रूमशी संपर्क साधून मालगाडी थांबवण्यात आली. ट्रेन थांबवनंतर त्याच रुळांवर हत्तीणीने सुरक्षितपणे पिल्लाला जन्म दिला.
ट्रेन जवळपास दोन तास जागेवर थांबली आणि हत्तीणीने सुरक्षितपणे आपल्या पिलाला जन्म दिला. प्रसूतीनंतर स्थानिक रहिवासी आणि वन अधिकाऱ्यांनी हत्तीण आणि पिलाला पुन्हा त्यांच्या कळपाच्या दिशेने हुसकावले.
या घटनेचा व्हिडिओ रेल्वे कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी टिपला होता.
पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटले आहे की, "मानव आणि वन्यजीव संघर्षाच्या बातम्यांपलीकडे, ही घटना मानव-प्राणी सुसंवादाचे सुंदर उदाहरण आहे."
त्यांनी झारखंडच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे विशेष कौतुक केले आहे, ज्यांच्या तत्परतेमुळे हत्तीणीला सुरक्षितपणे बाळंतपण करता आले.
मंत्री यादव यांनी आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधले. पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय (MoEFCC) आणि रेल्वे मंत्रालयाने मिळून संपूर्ण भारतातील 3500 किलोमीटर रेल्वे ट्रॅकचे सर्वेक्षण करून 110 हून अधिक 'वन्यजीव संवेदनशील' क्षेत्रांची नोंद घेतली आहे.
वन्यप्राण्यांच्या अपघातांना आळा घालणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. विशेषतः जेथे जंगलमार्ग आणि रेल्वेमार्ग एकमेकांना छेदतात अशा भागांमध्ये हा उपक्रम राबवला गेला आहे.