IPS Trainee Uday Reddy case File Photo
राष्ट्रीय

IPS Trainee Uday Reddy case: "तिने संमतीशिवाय मला किस केलं": छळाचा आरोप असलेल्या IPS प्रशिक्षणार्थीचा जीवन संपविण्याचा प्रयत्न

महिला प्रशिक्षणार्थीने केलेल्‍या तक्रारीनंतर गुन्‍हा दाखल झाल्‍यानंतर धक्‍कादायक कृत्‍य, उपचार सूरु

पुढारी वृत्तसेवा

IPS Trainee Uday Krishna Reddy case: हैदराबाद येथील 'नॅशनल पोलीस अकॅडमी'मधील आयपीएस प्रशिक्षणार्थी (IPS Trainee) उदय कृष्णा रेड्डी यांनी जीवन संपविण्याचा प्रयत्न केला आहे. एका महिला प्रशिक्षणार्थी सहकारी महिलेचा लैंगिक छळ, शारीरिक मारहाण, पाठलाग, धमकावणे आणि ब्लॅकमेल करणे यांसारख्या गंभीर आरोपांखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली. त्यांच्‍यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, जीवन संपविण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी उदय कृष्णा रेड्डी यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आरोप करणाऱ्या महिला आयपीएस अधिकाऱ्याबरोबर आपले प्रेमसंबंध होते, तसेच लग्नानंतरही तिने शारीरिक व भावनिक संबंध सुरू ठेवण्याचा आग्रह धरल्याचा दावा केला आहे.

महिला प्रशिक्षणार्थीने दिली होती तक्रार

काही दिवसांपूर्वीच ३० वर्षीय महिला आयपीएस प्रशिक्षणार्थीने रेड्डीविरोधात पाठलाग करणे (Stalking), मारहाण, गुन्हेगारी धमकी आणि संमतीशिवाय खाजगी व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची तक्रार दाखल केली होती. जून महिन्याभरात या घटना घडल्याचे तिने तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीच्या आधारे हैदराबाद पोलिसांनी 'भारतीय न्याय संहिता' (BNS) मधील विविध कलमे आणि 'माहिती तंत्रज्ञान कायद्या'च्या (IT Act) संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

महिला अधिकाऱ्याचे गंभीर आरोप

महिला अधिकाऱ्याने तक्रारीत आरोप केला आहे की, रेड्डी यांनी तिला व्हॉट्सॲपवर अश्लील संदेश पाठवले. तसेच अन्य प्रशिक्षणार्थींसमोर आक्षेपार्ह वक्तव्ये केली. इतर एका प्रशिक्षणार्थीसोबत संबंध असल्याचा आरोप करत त्याने तिच्यावर ते मान्य करण्यासाठी दबाव आणला. शिवीगाळ केली. तसेच, रेड्डीने तिचा मोबाईल फोन जबरदस्तीने घेतला, पासवर्ड विचारून खाजगी चॅट्स तपासले आणि फोन स्वतःच्या खोलीत घेऊन गेल्याचा आरोपही तिने केला आहे. तक्रारीत आणखी एका घटनेचा उल्लेख करताना रेड्डीने तिला अडवून जबरदस्तीने स्वतःच्या खोलीत नेले, शारीरिक मारहाण केली, केस उपटले, गळा आवळण्याचा प्रयत्न केला आणि मानगुटीवर सुरा ठेवून खोलीबाहेर जाण्यापासून रोखले. या वेळी त्याने तिच्यावर कंडोमची पाकिटे फेकल्याचा दावाही तिने केला आहे. १० जुलै रोजी झालेल्या एका मारहाणीदरम्यान त्याने अयोग्य स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही तिने केला आहे.

रेड्डी यांच्‍यावर ब्लॅकमेलिंगचाही आरोप

सर्वात गंभीर आरोपांपैकी एक म्हणजे पीडितेने आरोप केला आहे की, रेड्डी यांनी तिच्या संमतीशिवाय खासगी व्हिडिओ गुपचूप रेकॉर्ड केला. तसेच ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने तो तिच्या पतीला पाठवला. खोटी आणि बदनामीकारक माहिती पसरवून तिची प्रतिष्ठा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही तिने केला आहे.

'आमचे संबंध होते, तिनेच शारीरिक संबंधांचा आग्रह धरला'

जीवन संपविण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी रेड्डी यांनी दोन पानांचे पत्र लिहित आपल्‍यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी असा दावा केला की, त्याच्या विरोधानंतरही महिलाच त्याच्या खोलीत जबरदस्तीने आली होती. तसेच तिच्या लग्नानंतरही त्यांचे शारीरिक आणि भावनिक संबंध सुरूच होते. "च माझ्या खोलीत आली आणि भांडण सुरू केले. मी ते पुराव्यादाखल फोनमध्ये रेकॉर्ड केले. स्वसंरक्षणार्थ मी फक्त प्रतिक्रिया दिली, ज्याचा व्हिडिओ पुरावा उपलब्ध आहे." यानंतर ९ जुलै रोजी ती स्वतःहून माझ्या खोलीत आली. माझी संमती नसताना तिने माझे चुंबन घेतले आणि मला मिठी मारली. मी तिला आधीच अनेकदा माझ्या खोलीत न येण्यास सांगितले होते, म्हणूनच मी पुराव्यासाठी हे रेकॉर्ड करून तिच्या पतीला पाठवले. तिने नंतर सर्व गोष्टींचा विपर्यास करून मारहाणीचा खोटा आरोप केल्याचा दावा रेड्डी यांनी या पत्रात केला आहे. मित्रांच्या चिथावणीवरून तिने माझ्‍याविरोधात तक्रार दाखल केल्याचा दावा करत संबंधित महिला अधिकारी, तिचा पती आणि इतर दोघांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.

रेड्डी यांच्यावर उपचार सुरू

या प्रकरणाचा तपास सुरू असून पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्‍पष्‍ट केले आहे. रेड्डी सध्या रुग्णालयात वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. 'सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी'च्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट देऊन डॉक्टरांशी चर्चा केली असून, घटनेची माहिती आणि रेड्डी यांच्या प्रकृतीचा आढावा घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT