

Nashik double murder case : नाशिकरोड येथील जेलरोड परिसरात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नी आणि मुलाची ब्लेड सदृश चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या केली. या दुहेरी हत्याकांडानंतर पतीने स्वतः देखील विषारी औषध प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण नाशिक परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाशिकरोडच्या जेलरोड भागात हे हत्याकांड घडले. कौटुंबिक कारणातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. पतीने अत्यंत क्रूरपणे ब्लेड सारख्या धारदार चाकूने आधी पत्नीवर आणि नंतर मुलाच्या गळ्यावर वार केले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
पत्नी आणि मुलाचा खून केल्यानंतर पतीने स्वतः विषारी औषध पिऊन जीवन संपविणण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेतली. त्याला नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या भीषण घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पतीने एवढे टोकाचे पाऊल का उचलले? घरगुती वाद होता की इतर काही कारण? याचा शोध नाशिकरोड पोलीस घेत आहेत. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करत पंचनामा केला आहे.