प्रातिनिधिक छायाचित्र.  Pudhari
राष्ट्रीय

HC Divorce Verdict on Infertility : गर्भधारणा न होणे घटस्फोट मिळण्याचे कारण ठरू शकत नाही : हायकोर्ट

क्रूरतेच्या आधारावर घटस्फोटाची मागणी करणाऱ्या पतीची याचिका फेटाळली

पुढारी वृत्तसेवा

घटस्‍फोटाची मागणी करणार्‍या याचिकेवरील सुनावणीवेळी उच्‍च न्‍यायालयाने गर्भधारणेसाठीच्‍या उपचारावेळी महिलांवर येणार्‍या शारीरिक आणि भावनिक ताणाकडे विशेष लक्ष वेधले.

High Court divorce verdict on infertility : "विवाह हा केवळ संततीप्राप्तीचे साधन नाही. वैवाहिक जीवनात मूल न होणे ही क्रूरता ठरू शकत नाही. दाम्पत्याला गर्भधारणा न झाल्यास केवळ पत्नीला दोष देता येणार नाही," असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने क्रूरतेच्या आधारावर घटस्फोटाची मागणी करणाऱ्या पतीची याचिका फेटाळली. तसेच घटस्फोट नामंजुरीचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती जी.आर. स्वामीनाथन आणि एम.डी. सुमती यांच्या खंडपीठाने कायम ठेवला.

पतीची घटस्फोटासाठी न्यायालयात धाव

'बार अँड बेंच'ने दिलेल्या वृत्तानुसार, दाम्पत्याचा विवाह २००७ मध्ये झाला होता. पतीने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. त्याने आरोप केला की, सुरुवातीला वैवाहिक जीवन शांततेत गेले. मात्र यानंतर पत्नीने त्याचा अपमान करण्यास सुरुवात केली; कामावरून उशिरा आल्यास संशय घेणे, वारंवार माहेरी जाणे, तसेच वैवाहिक सहवासासही नकार देत होती. जून २०१६ मध्ये तिने सर्वांसमक्ष त्याला 'नपुंसक' म्हटले. तसेच चप्पल आणि झाडूने मारहाण केली, तिचे मंगळसूत्र काढून टाकले, त्यांचे फोटो फाडले आणि घर सोडून निघून गेली, असे आरोपही पतीने केले होते.

पत्नीने आरोप फेटाळले, कौटुंबिक न्यायालयाचा घटस्फोटास नकार

पत्नीने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. कौटुंबिक न्यायालयात तिने सांगितले की, गर्भधारणा व्हावी आणि वैवाहिक जीवन सुरळीत सुरू राहील या आशेने तिने गर्भाशयातील गाठीवर (फायब्रॉइड) शस्त्रक्रिया करून घेतली. तसेच गर्भधारणेसाठी उपचारही केले. मारहाण, अपमान आणि घर सोडून जाणे यांसारखे आरोप समाधानकारकपणे सिद्ध झाले नाहीत, असे स्पष्ट करत कौटुंबिक न्यायालयाने पतीची घटस्फोटाची मागणी फेटाळली. या निकालास पतीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

गर्भधारणेसाठीच्या उपचाराच्या परिणामांवर हायकोर्टाने वेधले लक्ष

पतीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती जी.आर. स्वामीनाथन आणि एम.डी. सुमती यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने प्रजनन क्षमतेशी संबंधित उपचारांमुळे येणाऱ्या शारीरिक आणि भावनिक ताणाकडे विशेष लक्ष वेधले. न्यायालयाने नमूद केले की, अशा उपचारांमध्ये संप्रेरकांची (हार्मोन्सची) इंजेक्शन्स, वारंवार स्कॅन्स आणि रक्तचाचण्या, शरीरावर केल्या जाणाऱ्या क्लेशकारक वैद्यकीय प्रक्रिया, शारीरिक अस्वस्थता, चिंता आणि आशा-निराशेचे वारंवार येणारे टप्पे यांचा समावेश असू शकतो. पत्नीची अशा उपचारांना सामोरे जाण्याची तयारी ही, तिने वैवाहिक नाते सोडून दिले होते किंवा जाणिवापूर्वक वैवाहिक जीवन टाळले होते, या आरोपांशी विसंगत होती.

...असे वर्तन म्हणजे पतीशी क्रूरतेने वागणे नव्हे

"जेव्हा एखादी पत्नी, त्यातील शारीरिक आणि भावनिक कष्ट माहीत असूनही, मूल होण्याच्या आणि वैवाहिक नाते टिकवण्याच्या आशेने स्वेच्छेने अशा उपचारांना सामोरे जाते, तेव्हा तिच्या या वर्तनाला कोणत्याही प्रकारे विवाह नाकारणे किंवा पतीशी क्रूरतेने वागणे असे मानले जाऊ शकत नाही," असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

वंध्यत्व निवारण उपचारांचे शारीरिक परिणाम महिलेलाच भोगावे लागतात

मूल न होण्याबाबतची भावनिक वेदना पती-पत्नी दोघांनाही होत असली, तरी वंध्यत्व निवारण उपचारांचे शारीरिक परिणाम मात्र खुद्द महिलेलाच भोगावे लागतात. रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये मानसिक तणावामुळे ढाळलेले अश्रू, वैद्यकीय अहवालापूर्वीची चिंता, उपचारादरम्यान सहन केलेल्या वेदना, एका प्रयत्नानंतर दुसऱ्या प्रयत्नापर्यंत गर्भधारणेची बाळगलेली आशा या गोष्टींना वैवाहिक वादाच्या खटल्यातील केवळ आरोपांपुरते मर्यादित केले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत जोडप्याचे दीर्घकाळ वेगळे राहणे हेच क्रूरता किंवा विवाह कायमचा संपुष्टात आल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे, हा युक्तिवादही न्यायालयाने फेटाळून लावला. तसेच पत्नीने वैवाहिक जीवन पुन्हा सुरू करण्याची आपली तयारी सातत्याने दर्शवली होती, असे स्पष्ट करत पतीची याचिका फेटाळून लावत घटस्फोटास नकार देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयानेही कायम ठेवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT