इंदूर शहर भिकारीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने राबवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान हे प्रकरण समोर आले. प्रशासनाच्या दाव्यानुसार, मांगीलाल यांच्याकडे एक तीन मजली इमारतीसह तीन पक्की घरे, तीन रिक्षा आणि कार आहे. त्यांन कारलला चालकही ठेवला आहे.
Indore crorepati beggar case
इंदूर : इंदूरमध्ये ‘करोड़पती भिकारी’ म्हणून चर्चेत आलेल्या मांगीलालच्या प्रकरणा नवा ट्विस्ट आला आहे. प्रशासनाने मांगीलालकडे अनेक घरे, रिक्षा आणि कार असल्याचा दावा केला असताना, त्याच्या नातेवाईकांनी मात्र हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.ते भिकारी नाहीत, त्यांचे फोटो चुकीच्या चुकीच्या पद्धतीने व्हायरल झाले आहेत. सराफा बाजारात व्याजाने दिलेले पैसे वसूल करण्यासाठी तिथे जात असे, असा दावा मांगीलाल यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. कोणतेही घर हे मांगीलालच्या नावावर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता या प्रकरणी प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
इंदूर शहर भिकारीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने राबवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान हे प्रकरण समोर आले. सराफा परिसरात एक कुष्ठरोगी व्यक्ती भीक मागत असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाला मिळाली होती. त्याआधारे पथकाने मांगीलालला रेस्क्यू करून निवारा केंद्रात हलवले होते. प्रशासनाच्या दाव्यानुसार, मांगीलालकडे तीन पक्की घरे आहेत, ज्यात एका तीन मजली इमारतीचा समावेश आहे. याशिवाय त्याच्या नावावर तीन रिक्षा असून त्या भाड्याने चालवल्या जातात. इतकेच नाही तर, त्याच्याकडे एक कार असून त्यासाठी त्याने चालकही ठेवला असल्याचा दावा करण्यात आला होता. या माहितीनंतर सोशल मीडियावर मांगीलाल यांची 'करोडपती' भिकारी अशी खिल्ली उडवली जावू लागली होती.
मांगीलाल हे कुष्ठरोगाने पीडित असून प्रशासनाने त्यांना भिकारी समजून रेस्क्यू केले होते. मांगीलाल यांच्या पुतण्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, "जेव्हा मी त्यांना निवारा केंद्रात (शेल्टर होम) भेटलो, तेव्हा त्यांनी स्पष्ट केले की ते भिकारी नाहीत. ते सराफा बाजारात आपले पैसे वसूल करण्यासाठी गेले होते, काही गैरसमजामुळे त्यांचे फोटो भिकारी म्हणून व्हायरल करण्यात आले." प्रशासनाने त्यांच्या नावावर जी संपत्ती असल्याचे सांगितले आहे, ती माहिती तथ्यहीन असून त्याबाबत चुकीची माहिती पसरवली गेल्याचा आरोपही पुतण्याने केला आहे.
प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मांगीलालच्या पुतण्याने सांगितले की, "माझ्या काकांच्या संपत्तीबाबत चुकीची माहिती दिली जात आहे. तीन मजली घराचा उल्लेख केला जात आहे, ते घर माझ्या आईच्या नावावर आहे. सरकारी रेकॉर्डमध्ये सर्व काही स्पष्ट आहे. त्या घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते मी स्वतः भरतो आणि त्याशी संबंधित सर्व कागदपत्रे आमच्याकडे उपलब्ध आहेत." एका अन्य घरावरून कुटुंबाचा दुसऱ्या व्यक्तीशी वाद सुरू असून ते प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित असल्याची माहितीही त्याने दिले.
मांगीलालच्या पुतण्याने दिलेल्या माहितीनुसार, मांगीलाल सराफा बाजारात भीक मागण्यासाठी जात नसत. ते 'बुलियन मार्केट'मध्ये छोट्या व्यावसायिकांना पैसे उधार देत असत. शारीरिक व्याधीमुळे त्यांना चालता-फिरता येत नाही, म्हणून ते चाकांच्या फळीचा (स्केटबोर्डसारखा तक्ता) वापर करतात. याच स्वरूपामुळे लोकांना ते भीक मागत असल्याचे वाटले आणि त्यांचे फोटो व्हायरल झाले.
भीक निर्मूलन मोहिमेचे नोडल अधिकारी दिनेश मिश्रा यांच्या मते, प्राथमिक तपासात मांगीलाल २०२१-२२ पासून भीक मागत असल्याचे समोर आले आहे. त्याने सराफा बाजारात ४ ते ५ लाख रुपये व्याजाने दिले असून, त्यातून त्याला दररोज १००० ते २००० रुपये उत्पन्न मिळत होते. याव्यतिरिक्त भीक मागूनही तो दिवसाला ४०० ते ५०० रुपये कमावत होता, असा दावा प्रशासनाने केला आहे.
या प्रकरणी इंदूरचे जिल्हाधिकारी शिवम वर्मा यांनी सांगितले की, प्रशासनाला संबंधित व्यक्तीच्या मालमत्तेबाबत प्राथमिक माहिती मिळाली आहे. सर्व तथ्ये आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. पडताळणीशिवाय कोणताही अंतिम निष्कर्ष काढला जाणार नाही. तसेच इंदूरमध्ये भीक मागणे किंवा देणे हा कायदेशीर गुन्हा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, भीक निर्मूलन क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘प्रवेश’ या एनजीओच्या अध्यक्षा रुपाली जैन यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. त्यांच्या मते, हे प्रकरण केवळ कायद्याचे नसून मानवी संवेदनांचे आहे. त्यांनी सांगितले की, "मांगीलाल काही वर्षांपूर्वीपर्यंत गवंडी काम करत असे, मात्र कुष्ठरोगामुळे त्याच्या हातापायांची बोटे निकामी झाली. सामाजिक आणि कौटुंबिक उपेक्षेमुळे त्याने रात्रीच्या वेळी सराफा परिसरात बसण्यास सुरुवात केली. त्याने सर्व संपत्ती केवळ भीक मागून जमा केली, असे मानणे वास्तवापासून दूर असू शकते." गेल्या चार वर्षांत मांगीलालला दोनदा भीक मागण्यापासून परावृत्त करण्यात आले होते, मात्र आजारपण आणि सामाजिक तिरस्कारामुळे तो पुन्हा त्याच स्थितीत पोहोचला, असेही जैन यांनी नमूद केले.