

DGP Ramchandra Rao video viral
बेंगळुरू: कर्नाटकमधील नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे महासंचालक (DGP) रामचंद्र राव यांच्या शासकीय कार्यालयात काही महिलांसोबतचे आक्षेपार्ह कृत्य करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. रामचंद्र राव हे अभिनेत्री आणि सोने तस्करी प्रकरणातील आरोपी रान्या राव हिचे वडील आहेत. या प्रकरणावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तीव्र संताप व्यक्त करत स्पष्टीकरण मागवले आहे, तर दुसरीकडे संबंधित अधिकाऱ्याने हे सर्व आरोप फेटाळून लावत व्हिडिओ 'मॉर्फ' (छेडछाड केलेला) असल्याचा दावा केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी गणवेशात असताना त्यांच्या अधिकृत चेंबरमध्ये वेगवेगळ्या महिलांसोबत जवळीक साधताना दिसत आहेत. कामाच्या वेळेतच डीजीपींच्या कार्यालयात हे गुप्त चित्रीकरण करण्यात आल्याचे समजते. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिला वेगवेगळ्या दिवशी आणि वेगवेगळ्या पेहरावात कार्यालयात आल्याचे दिसून येते. अधिकृत काम सुरू असतानाच राव त्यांच्याशी जवळीक साधताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतली असून त्यांनी संबंधित विभागाकडून सविस्तर माहिती मागवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून पोलीस दलात अशा घटना कशा घडू शकतात, असा सवाल उपस्थित केला आहे. या प्रकरणामुळे राज्य सरकारवर दबाब वाढला असून, संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंग किंवा विभागीय चौकशीची टांगती तलवार आहे.
दरम्यान, डॉ. रामचंद्र राव यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 'इंडिया टुडे'शी बोलताना ते म्हणाले की, "हा व्हिडिओ पूर्णपणे मॉर्फ केलेला आणि बनावट आहे. मला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे."