Nitin Gadkari on Indira Gandhi
नवी दिल्ली : आणीबाणाच्या काळात संविधानाचा आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम इंदिरा गांधींच्या सरकारने केले. केवळ खुर्ची वाचवण्यासाठी अधिकारांचा वापर केला गेला, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. तसेच आणीबाणीच्या काळात जनसंघाचे, समाजवादी पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणीबाणीला विरोध करत होते. त्यांना मिसा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. संघ विचारांनी प्रेरित कार्यकर्त्यांवर अटक सत्र चालवले गेले. त्यामुळे त्या काळात त्यांना, त्यांच्या कुटूंबियांना मोठा त्रास सहन करावा लागला, यात अनेक कुटूंब उद्ध्वस्त झाली, असेही ते म्हणाले.
आणीबाणीचे ५० वर्षे असा कार्यक्रम एका वृत्तसंस्थेने दिल्लीत आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे संस्थापक के. एन. गोविंदाचार्य, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे अध्यक्ष रामबहादुर राय, मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ल, अरविंद मार्डीकर, डॉ. सच्चिदानंद जोशी, आकाश पाटील उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले की, देशात आणीबाणी लागू केली तेव्हा जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली देशात भ्रष्टाचार विरोधी आंदोलन सुरू झाले होते. काँग्रेस विरोधी लोकांनी याचे समर्थन केले होते. गोविंदाचार्य, रामबहादुर राय यांच्यासारख्या लोकांनी या आंदोलनाला ताकद दिली. गुजरातमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांच्याविरुद्ध आंदोलन सुरू झाले. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या विरुद्ध आंदोलनात उतरले होते. आणीबाणीच्या काळात वृत्तपत्रांवर सरकारी अधिकारी नियंत्रण ठेवू लागले होते. देशाने लोकशाहीचे घृणास्पद चित्र त्यावेळी पाहिले, असेही ते म्हणाले.
आणीबाणीच्या काळात मी विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता होतो. तेव्हा माझ्या मामाला अटक झाली होती. काही दिवसांनी माझ्या आजोबांचे निधन झाले. मात्र त्यांच्या अंतिम संस्काराला मामाला पॅरोलवर सोडले जात नव्हते. कारण नसताना वेगवेगळी कागदपत्रे मागितली गेली. अखेर ३ दिवसांनी कागदपत्रे दिली मात्र त्याला संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाली म्हणून त्या दिवशी मामाला सोडता येणार नसल्याचे सांगितले. अखेर चौथ्या दिवशी सकाळी सोडण्यात आले. आजोबांच्या अंत्ययात्रेतही पोलीस होते.
भुतकाळात संघाच्या लोकांनी काय सोसले हे नव्या पिढीला माहिती नाही. त्या काळात आपला विचार जपण्याचे काम ज्यांनी केले त्यांच्यामुळे आज आम्ही चांगले दिवस बघत आहोत. आज आम्ही जिथे आहोत त्याचे श्रेय आमचे नाही तर आमच्यासाठी लढलेल्या अनेक स्वयंसेवकांचे आहे. त्यांना मी कधीही विसरू शकत नाही, असेही ते म्हणाले.
आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे नव्या पिढीला त्याविषयी माहिती असणे ही अपेक्षा करता येणार नाही. नव्या पिढीला आणीबाणीबद्दल सांगण्यासाठी योजना असायला हवी. भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशात संविधान धाब्यावर बसविण्याचा प्रयत्न यशस्वी होत नाही, हे प्रत्येक पिढीला सांगितले गेले पाहिजे. असे प्रतिपादन सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले. आणीबाणीबद्दल बोलणे म्हणजे केवळ स्मरणरंजन राहू नये. त्यासाठी विविध माध्यमांद्वारे प्रयत्न होणे आवश्यक आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने त्यासाठी स्टडी सर्कल चालवावे, देशभरातील विद्यापीठात त्याद्वारे आणीबाणीचा इतिहास सांगता येईल, असेही ते म्हणाले.
आणीबाणीमुळे देशाचे मोठे नुकसान झाले. अनेकांवर तुरुंगात अत्याचार झाले, अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या, अनेक कुटुंबे उध्वस्त झाली. सत्तेची लालसा आणि अहंकारामुळे व्यवस्था कशी विकृत होते, याचे उदाहरण आणीबाणीत दिसून आले. न्यायपालिका आणि बहुतांशी प्रसारमाध्यमेदेखील सत्तेपुढे त्यावेळी नतमस्तक झाली होती, हे नव्या पिढीला सांगण्याची गरज आहे. आज हाती संविधानाची प्रत घेऊन मिरवणाऱ्यांना देशाची माफी मागण्यास देखील भाग पाडायला हवे, असेही दत्तात्रेय होसबळे म्हणाले.