

पुणे: आता आपण इ़थेनॉल, हायड्रोजनवर चालणार्या वाहननिर्मितीत आघाडी घेतली आहे. त्याचाही फायदा आपल्या देशातील ऑटो कंपन्यांना झाला आहे. बजाजसारख्या कंपन्यांची निर्यात वाढली आहे. 2014 पर्यंत भारतीय ऑटो कंपन्यांची निर्यात ही 13 लाख कोटी होती.
आता ती 22 लाख कोटी इतकी झाली आहे. त्यामुळे आगामी 7 वर्षांत आपण जगातील नंबर एकचे ऑटोमोबाईल निर्मिती हब होणार आहे, अशी माहिती माहिती केंद्रीय वाहतूक आणि दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.
पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने गडकरी बोलत होते. ते म्हणाले, पुणे चाकण एमआयडीसीच्या मर्सिडीज प्रकल्पातून आता संपूर्ण जगासाठी इलेक्ट्रिक मर्सिडीज कारचे उत्पादन लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पातून वर्षाला सुमारे दोन लाख इलेट्रिक कारची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट असून भारत आगामी 7 वर्षांत जगातील नंबर एकचा ऑटो हब होईल. (Latest Pune News)
ते म्हणाले की, मर्सिडिज बेन्झ या कंपनीचा पुण्यातील चाकण एमआयडीसीमध्ये इंधनावर चालणार्या कारचा जुनाच प्रकल्प आहे. त्यांच्या व्यवस्थापनाशी माझी भेट झाली. त्यांनी या प्रकल्पातून वर्षाला 20 हजार इलेक्ट्रिक कारचे उत्पादन करण्याचा निर्णय मला बोलून दाखवला. पण, मी त्यांना विनंती केली की, तुम्ही 1 लाख इलेक्ट्रिक कारची निर्मिती करा.
भारतासाठी किंमत थोडी कमी ठेवा. या माझ्या विनंतीला त्यांनी सकारात्मक होकार दिला. त्यामुळे आता पुण्याच्या चाकणमधून इलेक्ट्रिक मर्सिडिज कार अवघ्या जगाला निर्यात होणार आहेत. त्यामुळे मोठा रोजगार पुण्यासह राज्यात अन् पर्यायाने देशात निर्माण होईल.