India-pakistan war : भारतीय लष्कराने शुक्रवारी नियंत्रण रेषेवर (LOC) पाकिस्तानच्या लष्करी चौकीवर केलेल्या कारवाईचा पहिलावहिला व्हिडीओ जाहीर केला आहे. यामध्ये भारतीय हल्ल्यात चौकी उद्ध्वस्त झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या सैन्याने ८ व ९ मे २०२५ च्या मध्यरात्री संपूर्ण पश्चिम सीमेजवळ ड्रोन आणि इतर दारुगोळ्यांचा वापर करून अनेक हल्ले केले. हे सर्व हल्ले प्रभावीपणे परतवले, अशी माहिती अशी माहिती आज (दि.९ मे) भारतीय लष्कराने 'एक्स'वर दिली.
लष्कराने 'एक्स' पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'पाकिस्तानी सशस्त्र दलांनी ८ आणि ९ मे च्या रात्री संपूर्ण पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रांनी हल्ला केला. या काळात पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर अनेक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि एकतेचे रक्षण करण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. X (पूर्वीचे ट्विटर) वरील सकाळच्या पोस्टमध्ये लष्कराने एक लहानसा व्हिडिओही शेअर केला असून, “सर्व दुर्जन हेतूंना कठोर उत्तर दिले जाईल. भारतीय लष्कर हे देशाची सार्वभौमता आणि भौगोलिक अखंडता राखण्यासाठी कटिबद्ध आहे. प्रत्येक विघातक कारवाईला ठोस उत्तर दिले जाईल, असे लष्कराने स्पष्ट केले आहे.
लष्कराने सांगितले की, जम्मू आणि काश्मीरच्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानी लष्कराने रात्री केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा यशस्वीपणे प्रतिकार करण्यात आला. नियंत्रण रेषेवरील संघर्षविराम उल्लंघनांना “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत ठोस प्रत्युत्तर देण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान पाकिस्तानकडून पाठवण्यात आलेल्या ५० हून अधिक स्वार्म ड्रोनना निष्क्रिय करण्यात आले. ही मोठ्या प्रमाणावरची अँटी-ड्रोन कारवाई उदमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा (सर्व जम्मू आणि काश्मीरमधील) व पठाणकोट (पंजाब) या भागांमध्ये लष्कराच्या हवाई संरक्षण युनिट्सद्वारे करण्यात आली. नागरोटा सेक्टरमधील व्हिडीओत हवेत उडवलेले ड्रोन दाखवले गेले. या कारवाईत L-70 तोफा, Zu-23 मिमी, शिल्का प्रणाली आणि इतर अत्याधुनिक अँटी-ड्रोन उपकरणांचा वापर करण्यात आला, ज्यामुळे लष्कराची हवाई धोके परतवण्याची क्षमता स्पष्ट झाली आहे.
भारतीय सैन्याच्या हल्ल्यात पाकिस्तानच्या चौकीचा कोणता सेक्टर उद्ध्वस्त झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या व्हिडिओवरून हे स्पष्ट होते की, भारतीय सैन्य पाकिस्तानच्या युद्धबंदी उल्लंघनाला योग्य उत्तर देत आहे. पाकिस्तानी सैन्याकडून नियंत्रण रेषेवर करण्यात आलेल्या गोळीबारात १५ हून अधिक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारतीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जम्मू आणि काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. पाकिस्तानी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, देशातील अनेक सीमावर्ती शहरांमध्ये ब्लॅकआउट लागू करण्यात आला.
गुरुवारी रात्री पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट, उदमपूर आणि इतर काही लष्करी ठिकाणांवर क्षेपणास्त्रे व ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला, ज्याचा भारतीय लष्कराने यशस्वीपणे प्रतिकार केला. अखनूर, सांबा, बारामुल्ला, कुपवाडा आणि इतर अनेक ठिकाणी रात्री सायरन आणि स्फोट ऐकायला मिळाले, कारण लष्कराकडून सीमारेषेवर व्यापक हवाई गस्त सुरू होती. गुरुवारी दुपारी संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तानने देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागातील १५ शहरांमध्ये लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.
पाकिस्तानकडून अवंतिपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, बठिंडा, चंदीगड, नाल, फालोडी, उत्तरलाई आणि भुज या ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला होता. प्रत्युत्तरादाखल भारताने कमिकाझे ड्रोनचा वापर करून लाहोरमधील पाकिस्तानी हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केली. ही कारवाई त्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी झाली, ज्यात भारताने एप्रिल २२ रोजी पाहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत पाकिस्तान व पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, देशाच्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी देश पूर्णपणे सज्ज आहे. भारत नेहमीच संयम बाळगणारा व जबाबदारीने वागणारा देश राहिला आहे. संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यावर आमचा विश्वास आहे. मात्र कोणी या संयमाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याला योग्य उत्तर दिलं जाईल. भविष्यातही आम्ही अशा जबाबदार प्रतिसादांसाठी तयार आहोत," असेही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले होते.