IAS Rinku Singh Rahi Resignation
अलीगड : उत्तर प्रदेश केडरचे २०२२ च्या बॅचचे आयएएस (IAS) अधिकारी रिंकू सिंह राही यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. दोन पानांच्या राजीनाम्यात त्यांनी मुख्य कारणही दिले आहे. आता मुलाचे हे दु:ख पाहून त्यांचे वडील सौदान सिंह राही भावूक झाले आहेत. "माझ्या मुलाने प्रशासनासाठी गोळ्या झेलल्या, पण आज त्याला काम दिले जात नाहीये," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आयएएस राही यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे की, आपल्याला सक्रियपणे काम करण्याची कोणतीही पुरेशी संधी दिली गेली नाही आणि त्यांना जाणीवपूर्वक डावलले गेले. घटनात्मक चौकटीच्या पलीकडे एक 'समांतर व्यवस्था' कार्यरत आहे, ज्यामुळे त्यांना अर्थपूर्ण काम करण्यापासून रोखले गेले. पगार मिळत असूनही जनतेची सेवा करण्याची संधी मिळत नव्हती, त्यामुळे पदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य वाटले नाही," असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
जुलै २०२५ मध्ये शाहजहानपूर जिल्ह्यात उपविभागीय दंडाधिकारी (SDM) म्हणून रुजू झाले असताना रिंकू सिंह राही चर्चेत आले होते. एका तपासणीदरम्यान त्यांना परिसरात कचरा आणि काही लोक उघड्यावर लघूशंका करताना आढळले होते. या घटनेनंतर वकिलांशी निर्माण झालेला वाद मिटवण्यासाठी आणि 'नियम सर्वांना समान आहेत' हा संदेश देण्यासाठी राही यांनी स्वतः सार्वजनिक ठिकाणी वकिलांसमोर उठाबशा काढल्या होत्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता, त्यानंतर राज्य सरकारने त्यांची बदली 'महसूल परिषद' येथे केली होती.
रिंकू सिंह राही यांची कारकीर्द ही नेहमीच चर्चेत राहिली आहे. मुझफ्फरनगरमध्ये समाजकल्याण अधिकारी असताना त्यांनी १०० कोटी रुपयांचा कथित घोटाळा उघडकीस आणला होता. या कारवाईनंतर त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यांना अनेक गोळ्या लागल्या होत्या. या हल्ल्यात त्यांचा चेहरा गंभीररीत्या जखमी झाला. या घटनेने विचलित न होता ते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत आयएएस अधिकारीपदी नियुक्त झाले होते.
रिंकू सिंह राही यांचे वडील सौदान सिंह राही माध्यमांशी बोलताना म्हणाले, "रिंकूने नेहमी प्रामाणिकपणाचा मार्ग निवडला, पण सरकारने त्याला तो सन्मान दिला नाही. होता. तो एक देशभक्त आणि मेहनती अधिकारी आहे." त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, २००९ मध्ये समाज कल्याण अधिकारी असताना रिंकूने मुजफ्फरनगरमध्ये सुमारे १०० कोटींचा घोटाळा उघडकीस आणला होता. त्यावेळी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात रिंकू यांनी आपला एक डोळा आणि जबडा गमावला, पण जिद्द सोडली नाही. अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी अभ्यास सुरू ठेवला आणि २०२३ मध्ये तो आयएएस अधिकारी.
आमचे कुटुंब आजही अत्यंत साधे जीवन जगते. आमच्याकडे काहीही नाही, हवे तर आमचा बँक बॅलन्स तपासा. माझ्या मुलाने इतकी मेहनत करून आयएएस पद मिळवले, प्रशासनासाठी गोळ्या खाल्ल्या, तरीही त्याला काम का दिले जात नाहीये? त्याने राजीनामा दिला नाही तर काम मागितले आहे. माझी नी सरकारला विनंती केली की, रिंकूच्या प्रामाणिकपणाची दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा, जेणेकरून देशातील प्रामाणिक अधिकाऱ्यांचा विश्वास ढासळणार नाही, असेही सौदान सिंह राही यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.